Jyoti chandekar paurnima pandit Tejaswini Pandit 
मनोरंजन

Jyoti chandekar: माझ्यापेक्षा आईवर प्रेक्षकांचं जास्त प्रेम हे मुलगी म्हणून न पटण्यासारखे; तेजस्विनी पंडितच्या बहिणीची आईसाठी खास पोस्ट

ज्योती यांची कन्या पौर्णिमा हिने सोशल मिडियावर पोस्ट करत ज्योती यांच्या आठवणीना वाट करून दिली आहे

अमृता चौगुले

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या 69 वर्षांच्या होत्या. अगदी मृत्यूपूर्वी काही दिवस आधीपर्यंत त्या अभिनयक्षेत्रात सक्रिय होत्या. जाण्यापूर्वी त्या ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीच्या व्यक्तिरेखेत दिसत होत्या. (Latest Entertainment News)

ज्योती यांना अनेक कलाकार तसेच मालिकेतील सहकारी कलाकार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी ज्योती यांची कन्या पौर्णिमा हिने सोशल मिडियावर पोस्ट करत ज्योती यांच्या आठवणीना वाट करून दिली आहे.

यामध्ये तिने आईसोबतच्या लहानपणीच्या आठवणी शेयर केल्या आहेत.

ती म्हणते, मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळू हळू कळू लागलं होतं . आई मला आणि तेजू ला कधीच पुरायची नाही, तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे . विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं, की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दी वाले आणि नाटकसिनेमा मधे काम करणारे घरी कधी येतील ह्याचा पत्ता च नसतो असं माझी आज्जी म्हणायची .

तेव्हा आपली आई ह्या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही . पण आई आता गेली ,अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक ,नंतर सिनेमा आणि आता वयाच्या ह्या टप्प्यात मलिंकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला .
माझ्या आणि तेजू च्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण.’

यानंतर पौर्णिमाने ज्योती यांच्या पूर्णा आजी या व्यक्तिरेखेबाबत लिहिले आहे. यात ती म्हणते,'अजूनही सोशल मीडिया वर पूर्णा आज्जी ला रिप्लेस करू नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही ,पूर्णा आज्जी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली,असा कलाकार होणे नाही अश्या अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं , किती प्रेक्षक जोडले आहेत ह्याची प्रचिती आली. आता पटतंय , कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो.
माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर- पंडित
एक रंगकर्मी, कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली ,रूबाबात राहिली ,माणसं जोडली,नाती बनवली,प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं.
ह्या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे,मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार 🙏🏻’
- पोर्णिमा पंडित’

या मालिकेत आता पूर्णा आजीच्या व्यक्तिरेखेत कोण दिसणार हे अजून समोर आले नाही. अनेक प्रेक्षकांनी मात्र या व्यक्तिरेखासाठी दुसऱ्या कोणाची निवड करू नका अशी विनंती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT