Tejashri Pradhan- Subodh bhave Marathi serial
मुंबई : सुबोध भावेने अलीकडेच होणार सून ती त्या घरची अशी पोस्ट करत आगामी प्रोजेक्टची उत्सुकता वाढवली होती. तर तेजश्रीनही तुला पाहते रे अशी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर अत्यंत हटके पद्धतीने या दोघांनीही चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. तर ही जोडी आगामी मालिकेतून येणार हे स्पष्ट झाले आहे. या मालिकेचा टीजर समोर आला आहे. आज रात्री 8.40 वाजता या मालिकेचा प्रोमो रिलीज होतो आहे.
ज्यात या सुबोध भावेचा मोनोलॉग आहे ज्यात तो म्हणतो की, घरची जबाबदारी पेलताना वय निघून गेलं आणि लग्नाची वेळही. माझ्यासाठी लग्न म्हणजे वचन आणि जबाबदारी निभावणे. एकमेकांचे होता होता आपल्या कुटुंबालाही सांभाळणे. मी आहे तसा स्वीकारणारी व्यक्ति आता मिळणे अवघड आहे. कधी कधी मलाही एकटेपण सतावते.
सुबोधचा मोनोलॉग संपतो तोच त्याच्या समोर बसलेली तेजश्री बोलू लागते. ती म्हणते, सगळे म्हणतात वय झाले आता लग्न उरकून घे. पण यांना कोण सांगणार मला नाही वाटत का लग्न व्हावं? आपले म्हणणारे हक्काचे माणूस आयुष्यात असावे. पैसा प्रतिष्ठा यापेक्षा त्याने आमचे नाते जपावे.पण अशी मुले आहेत का या दुनियेत? तो वरचा माझी लग्नगाठ बांधायला विसरला आहे बहुतेक.. असे म्हणत तीही लग्नाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते.
या मालिकेच्या निमित्ताने सुबोध आणि तेजश्री ही जोडी पहिल्यांदाच मालिकेत एकत्र दिसणार आहे. यापूर्वी हे दोघे हॅशटॅग तदैव लग्नं या सिनेमात एकत्र दिसले होते.