पुढारी ऑनलाईन डेस्क - "कर्मयोगी आबासाहेब" गणपतराव देशमुख यांचा धगधगता प्रवास रुपेरी पडद्यावर झळकला आहे. दिवंगत माजी कॅबिनेट मंत्री गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध या चित्रपटातून घेतला गेला आहे. या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पुण्यात पार पडला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख, निकिता सुखदेव चित्रपटाचे दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी तिकीट बारीवर १ कोटी ७२ लाख रुपयांचा गल्ला चित्रपटाने कमावला आहे. या चित्रपटातून माननीय गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे
मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.