मुंबई; पुढारी ऑनलाईन : सारेगमप लिटिल चॅम्प्सचे १४ दमदार स्पर्धक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि पहिल्याच आठवड्यात त्यांच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं. छोटे गायक तसंच अतिशय उत्तम छोटे वादकदेखील आपल्याला या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुरेख गाण्यांनी एक वेगळाच माहोल या लिटिल चॅम्प्सनी तयार केला. पहिल्याच आठवड्यात या स्पर्धकांच्या टॅलेंटची झलक पाहून या कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड या यांच्यासाठी परीक्षण करणं हे खूप अवघड असणार आहे हे मात्र नक्की.
पहिल्या आठवड्यातील या लिटिल चॅम्प्सच्या दमदार परफॉर्मन्सेस नंतर या आठवड्यात या मंचावर लोकसंगीताचा जागर होणार आहे. मुंबईची स्वरा जोशी म्हणजेच परीक्षकांचा लाडका रव्याचा लाडूही आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने सगळ्यांना क्लीन बोल्ड करणार आहे. तिच्या 'शेजारणीने बरं नाही केलं ग बया' या गाण्याने सर्वांना मंचावर ताल धरायला भाग पाडलं. परीक्षक देखील तिच्या या गाण्याने खूपच प्रभावित झाले. स्वरासोबत बाकी स्पर्धकसुद्धा परीक्षक आणि प्रेक्षकांनादेखील येत्या आठवड्यात लोकसंगीताने मंत्रमुग्ध करून टाकण्यासाठी सज्ज आहेत.