पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘सुशीला-सुजीत’ १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी तसेच स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक प्रथमच एकत्र येताहेत. ‘सुशीला-सुजीत’ची कथा आणि दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. ‘सुशीला-सुजीत या १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील गाणे एका समारंभात प्रकाशित करण्यात आले. यावेळी गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर नृत्य सादर केले.
सोहळ्यात निर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, प्रसाद ओक, निलेश राठी तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वरूण लिखते, गायक प्रवीण कुंवर आणि कविता राम, गीतकार मंदार चोळकर, पटकथा-संवाद लेखक अजय कांबळे, नृत्यदिग्दर्शक मेहुल गदानी आणि इतर कलाकार/तंत्रज्ञ उपस्थित होते. ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ आणि ‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. सोबत निलेश राठी सुद्धा आहेत.
“सोनाली आणि स्वप्नील हे थोडेसे वेगळे कास्टिंग या चित्रपटासाठी आम्ही केले आहे. स्वप्नील, सोनालीबरोबर या चित्रपटात अमृता खानविलकरसुद्धा आहे, हे दोन आठवड्यांपूर्वी आम्ही प्रेक्षकांसमोर आणले आणि आता चित्रपटाचे सॉंग प्रदर्शित करत आहोत. आम्हाला खात्री आहे की लोक चित्रपटाला पसंतीची पावती देतील,” असे प्रसाद ओक म्हणाले.
चित्रपटाबद्दल बोलताना स्वप्नील जोशी म्हणाले, “या आगामी चित्रपटात कित्येक गोष्टी पहिल्यांदाच साध्य होत आहेत. ‘सुशीला-सुजीत’च्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. सोनाली, प्रसाद आणि मी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने आमच्यासाठीही हा एक वेगळा अनुभव आहे. आता अमृता आल्याने चित्रपटाला वेगळा ग्लॅमर प्राप्त झाला आहे. या सर्वांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. आज प्रदर्शित झालेल्या प्रोमोशनल सॉंगवरूनसुध्दा चित्रपटाच्या वेगळेपणाची प्रचिती येते.”