मुंबई : पुढारी वृत्तसेवा
सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जौहर यांचा मॅनेजर आणि धर्मा प्रोडेक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता यांची आंबोली पोलीस ठाण्यात चार तास वांद्रे पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली.
ड्राईव्ह चित्रपटावरुन सुशांत आणि करण यांच्यात झालेला वादाबाबत ही चौकशी झाली आहे. सुशांत आत्महत्येनंतर आतापर्यंत वांद्रे पोलिसांनी 40 हून अधिक लोकांची चौकशी करुन त्यांची जबानी नोंदवून घेतली होती. चारजण वळगता इतर सर्वांची चौकशी वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी झाली होती, मात्र सिनेअभिनेता सलमान खान याची माजी मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची वांद्रे येथील बीट क्रमांक दोन, यशराज बॅनरचे प्रमुख आदित्य चौप्रा यांची वर्सोवा तर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सोमवारी सांताक्रुज पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती. महेश भट्ट यांच्यासोबत अपूर्वा मेहता यांनाही चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी समन्स पाठविले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी अकरा वाजता अपूर्वा मेहता हे आंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले होते.
अपूर्वा हे निर्माता-दिग्दर्शक करण जौहरचे मॅनेजर आणि धर्मा प्रोडेक्शनचे सीईओ म्हणून काम पाहतात. सुशांतला करणने ड्राईव्ह चित्रपटासाठी साईन केले होते, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर करणने हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित केला नाही, तो ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित केला होता. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादाविषयी काही वृत्त त्यावेळेस प्रसिद्ध झाले होते. याच संदर्भात अपूर्वा मेहता यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. दुपारी सव्वातीन वाजता त्यांना सोडून देण्यात आले. लवकरच सिनेअभिनेत्री कंगणा राणौत हिच्यासह इतर बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीनंतर त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल, असे एका अधिकार्याने सांगितले.