मनोरंजन

Gadad Andhar Movie : सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’ यादिवशी होणार प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटांनी नेहमीच विविधांगी विषय सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आशयघन कथानकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट टेक्निकलीही सक्षम बनला आहे. याची प्रचिती वेळोवेळी जगभरातील मराठी रसिकांना आली आहे. 'गडद अंधार' (Gadad Andhar Movie) हा आगामी मराठी चित्रपट त्या पुढे एक पाऊल टाकणारा ठरला आहे. आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेलं पाण्याखालचं जग 'गडद अंधार'मध्ये पहायला मिळणार आहे. बऱ्याच रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा 'गडद अंधार' हा सुपर नॅचरल थ्रीलरपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Gadad Andhar Movie)

निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठीत एक अनोखं धाडस करत दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये 'गडद अंधार'ची अचूक झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली आहे. मन मोहून टाकणारी पाण्याखालची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वरवर निळ्याशार दिसणाऱ्या समुद्राच्या खोल पाण्यात गडद अंधार आहे. या गडद अंधारात बरीच रहस्ये दडलेली आहेत.

पाण्याखालच्या अंधारात दडलेलं एक रहस्य जेव्हा जमिनीवरील प्रकाशात येतं तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ताल धरायला लावणारं गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतचं संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. यातील 'दरिया, दरिया…' हे गाणं चांगलंच गाजत आहे. 'गडद अंधार'चं कथानक आजवर कधीही प्रकाशात न आलेल्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारं असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतात.

दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रवाहापेक्षा काहीसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही जाणवतं. या चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं केलं आहे.

'बिग बॅास' आणि 'एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३' या रिअॅलिटी शोद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या जय दुधाणेला मोठ्या स्क्रीनवर पहाणं त्याच्या चाहत्यांसोबतच इतर सर्वसामान्य प्रेक्षकांसाठीही उत्सुकतेचं ठरणार आहे. नायिकेच्या भूमिकेत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेल्या नेहा महाजन यात जयसोबत आहे. त्यामुळे दोघांची केमिस्ट्रीही रसिकांना आकर्षित करणारी ठरेल.

जय-नेहाच्या जोडीला या चित्रपटात शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, श्री, बालकलाकार अस्था आदी कलाकारही आहेत. रोहितच्या जोडीला जुईली जोगळेकर राऊत आणि दिव्य कुमार यांनीही गाणी गायली आहेत. आदिनाथ पातकर यांनी गाण्याचे संयोजन केले आहे. प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माते आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT