सुबोध भावे-मानसी नाईक यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा! Instagram
मनोरंजन

सुबोध भावे-मानसी नाईक यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा!

Subodh Bhave-Manasi Naik Movie | मध्यप्रदेशात शूटिंगला सुरुवात!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषय, मांडणी आणि शीर्षक यामुळे मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. यामुळे हिंदीतील नामांकित निर्मातेही मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ या अनोख्या शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. अभिनेते सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मध्यप्रदेशात सुरुवात झाली आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट श्रेय पिक्चर्स कंपनीच्या बॅनरखाली तयार होत आहे. या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केलीय. त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. तसेच, त्या चित्रपट निर्माते विनय सिन्हा यांच्या कन्या आहेत. ज्यांनी ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘नसीब’ यांसारख्या अनेक अजरामर हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता नम्रता सिन्हा यांनी ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन आलोक जैन यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी हिंदीतील दिग्गज दिग्दर्शक मनोज कुमार आणि ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले आहे. चित्रपटातील संवाद लेखक ओंकार बर्वे आहेत. तर, सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे. त्यांनी ‘सरफरोश’, ‘रेडी’, ‘हम तुम’, ‘मेरे यार की शादी है’, ‘बँग बँग’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचे छायांकन केले आहे.

चित्रीकरणाला महाराष्ट्राबाहेर, मध्यप्रदेशात सुरुवात झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग मध्यप्रदेशातील इंदूर आणि परिसरात सुरू आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे फक्त दोन प्रमुख व्यक्तिरेखांवर आधारित असलेली कथा! मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच सुबोध भावे आणि मानसी नाईक यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

दिग्दर्शक आलोक जैन यांच्या मते, सुबोध आणि मानसी यांच्या व्यक्तिरेखांभोवती गुंफलेली ही कथा निश्चितच प्रेक्षकांना आकर्षित करेल. ‘सकाळ तर होऊ द्या’चे शीर्षक जितके हटके आहे, तितकाच या चित्रपटाचा लूकही वेगळा असणार आहे. केवळ दोन व्यक्तिरेखा असूनही, चित्रपटात अनेक नाट्यमय वळणे असतील, जी प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. तसेच, चित्रपटातील गाणी आणि संगीतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या चित्रपटातील प्रत्येक लोकेशन हे स्वतः एक पात्र भासेल, असे आलोक जैन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT