Sriya Reddy Mahakali Movie  Pudhari photo
मनोरंजन

Sriya Reddy | प्रभास ते अक्षय खन्ना...'या' अभिनेत्यांवर भारी पडलेली श्रिया रेड्डी आहे तरी कोण? 'महाकाली'मुळे होतेय प्रचंड चर्चा

Sriya Reddy | प्रभास ते अक्षय खन्ना... या अभिनेत्यांवर भारी पडलेली श्रिया रेड्डी आहे तरी कोण? महाकालीमुळे होतेय प्रचंड चर्चा

पुढारी वृत्तसेवा

दाक्षिणात्य आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री श्रिया रेड्डी सध्या ‘महाकाली’मुळे चर्चेत आहे. प्रभाससोबत सालार आणि इतर गाजलेल्या प्रोजेक्ट्समध्ये झळकलेल्या श्रियाने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. अक्षय खन्नासोबतही तिने काम केले असून, तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. आता ‘महाकाली’मधील तिच्या भूमिकेची चर्चा सुरू झाल्याने श्रिया रेड्डी नेमकी आहे तरी कोण, तिचा सिनेप्रवास कसा आहे आणि तिने कोणत्या महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्समधील आगामी ‘महाकाली’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. टीझरमध्ये अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अभिनेत्री श्रिया रेड्डीच्या दमदार लूकनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा रौद्र अंदाज पाहून तिची भूमिका नेमकी काय असणार, याची उत्सुकता वाढली आहे.

‘महाकाली’च्या टीझरमध्ये श्रिया रेड्डी एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळते. तिच्या चेहऱ्यावरील भाव, लूकमुळे तिचे पात्र कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे कळते. मात्र, तिच्या व्यक्तिरेखेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तिच्या भूमिकेभोवतीचे गूढ कायम आहे.

श्रिया रेड्डी हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील परिचित नाव आहे. तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच तिने रेडिओ आणि व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केले आहे. टीव्ही प्रेझेंटर म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

२००२ मध्ये ‘समुराई’ या चित्रपटातून श्रियाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटातील तिची भूमिका लहान होती. त्यानंतर २००३ मध्ये ‘अप्पुदापुडु’मध्ये ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. पुढे ‘वेयिल’ आणि ‘कांचीवरम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने उल्लेखनीय काम केले.

प्रभाससोबत ‘सालार’मध्ये अभिनय

प्रभासच्या ‘सालार: पार्ट १- सीजफायर’ या चित्रपटामुळे श्रिया रेड्डीला हिंदी प्रेक्षकांमध्ये मोठी ओळख मिळाली. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात तिने राधा रामा मन्नार ही व्यक्तिरेखा साकारली होती. प्रभाससोबतच्या या चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले. ‘सालार’च्या यशानंतर श्रियाच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. आता ‘महाकाली’मध्ये ती कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

श्रिया रेड्डीचे वैयक्तिक आयुष्यही चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. २००८ मध्ये तिने तमिळ चित्रपट निर्माता विक्रम कृष्णा यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर तिचे नाते दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध कुटुंबाशी जोडले गेले.

माजी क्रिकेटपटू भरत रेड्डी यांची मुलगी

श्रिया रेड्डीचा संबंध क्रिकेटविश्वाशीही आहे. ती भारताचे माजी टेस्ट क्रिकेटपटू भरत रेड्डी यांची मुलगी आहे.

‘महाकाली’ची कथा नेमकी काय?

‘महाकाली’ हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्समधील तिसरा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पूजा अपर्णा कोल्लुरु करत आहेत, तर कथा आणि स्क्रीनप्लेची जबाबदारी प्रशांत वर्मा यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी बंगालमध्ये असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट महिला केंद्रित सुपरहिरो चित्रपट म्हणून सादर केला जाणार आहे. भूमी शेट्टीही यात देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे.

‘हनु-मान’च्या यशानंतर प्रशांत वर्मा यांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे ‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नांचा शुक्राचार्यांचा लूक आणि श्रिया रेड्डीचा रौद्र अवतार सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT