Nitya Menon on Peddi Janhvi Kapoor  Instagram
मनोरंजन

Nitya Menon on Peddi Janhvi Kapoor | 'तिला ठामपणे नकार देता आला असता'; साऊथ स्टार नित्या मेननने 'पेड्डी'तील सीन्सवर घेतला आक्षेप

'पेद्दी' वादावर नित्या मेननचे स्पष्ट मत; महिला कलाकारांनी स्वतःच्या मर्यादा ठामपणे ठरवाव्यात

स्वालिया न. शिकलगार

सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या पेड्डी चित्रपटाबाबत एक नवे वक्तव्य समोर आले आहे. साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Nithya Menen हिने चित्रपटातील काही दृश्यांबाबत मत व्यक्त केल्याचे वृत्त चर्चेत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री Janhvi Kapoor हिच्या भूमिकेशी संबंधित काही दृश्यांवर नित्या मेननने अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटसृष्टीत कलाकारांना विविध प्रकारच्या भूमिका साकाराव्या लागतात. मात्र काही वेळा कथानकातील दृश्ये किंवा सादरीकरण यावरून चर्चा आणि वाद निर्माण होतात. पेड्डी चित्रपटाबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. नित्या मेननने कलाकारांनी आपल्या भूमिकांबाबत आणि दृश्यांबाबत ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

'पेद्दी' चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर आणि चित्रपटवर्तुळात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अभिनेत्री नित्या मेननने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिने हा चित्रपट पाहिलेला नसला तरी, पडद्यावर महिलांचे वस्तूकरण करण्याच्या प्रवृत्तीला ती विरोध करत असल्याचे सांगितले. मात्र, ही समस्या केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नसून जगभरातील मनोरंजन क्षेत्रात विविध स्वरूपात दिसून येते, असेही तिने नमूद केले.

एका मुलाखतीत बोलताना नित्या मेननने चित्रपटांच्या वाढत्या व्यावसायिकीकरणाकडे या समस्येचे मुख्य कारण म्हणून पाहिले. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यासाठी अनेकदा काही ठराविक फॉर्म्युल्यांचा वापर केला जातो. त्यातून महिलांच्या सादरीकरणाबाबत अतिरेक होण्याची शक्यता निर्माण होते, असे तिचे मत आहे. नित्या म्हणाली की, जर एखाद्याने अनेक वर्षे विशिष्ट प्रकारच्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम केले असेल आणि अचानक आक्षेप नोंदवला, तर चित्रपटसृष्टीकडून त्या आक्षेपांची गांभीर्याने दखल घेतली जाण्याची शक्यता कमी होते. "एखाद्या परिस्थितीत तुम्ही पूर्णपणे असहाय्य होता, यावर माझा विश्वास नाही. तुम्ही स्वतःची भूमिका ठामपणे मांडू शकता. हे सर्व त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

तिने कलाकारांच्या जबाबदारीवरही भर दिला. एखाद्या प्रसंगात किंवा भूमिकेत स्वतःला अस्वस्थ वाटत असेल, तर कलाकारांनी त्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची गरज असल्याचे ती म्हणाली. "मला जे योग्य वाटत नाही ते करण्यास मी कधीच तयार होणार नाही. कलाकारांनी स्वतःच्या मर्यादा आणि मूल्यांबाबत सुरुवातीपासूनच स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे," असे नित्याने सांगितले.

महिला कलाकारांना सल्ला देताना तिने म्हटले की, करिअरच्या सुरुवातीपासूनच आपण कोणत्या प्रकारच्या भूमिका स्वीकारणार आणि कोणत्या नाही, याबाबत ठाम भूमिका घेतली पाहिजे. अनेक वर्षे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अचानक आक्षेप घेतल्यास, उद्योगक्षेत्र त्याकडे गंभीरतेने पाहीलच असे नाही, असेही ती म्हणाली.

नित्या मेननच्या मते, कोणतीही व्यक्ती पूर्णपणे असहाय्य नसते. प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा आणि आवश्यक तेव्हा नकार देण्याचा अधिकार असतो. काही संधी गमवाव्या लागल्या तरी स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड न करण्याचा सल्ला तिने दिला. प्रसिद्धी किंवा स्टारडमपेक्षा वैयक्तिक मूल्ये महत्त्वाची असल्याचे तिने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT