अभिनेत्री सोहा अली खान आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिनयासोबतच ती आता ‘ऑल अबाऊट हर’ या तिच्या नव्या पॉडकास्टद्वारे एक महत्त्वाचा आणि तितकाच गरजेचा संवाद सुरू करत आहे. वयाच्या 45 व्या वर्षी स्वतःच्या शरीरात आणि मनात होणार्या बदलांमुळे प्रेरित होऊन तिने हा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर खुलेपणाने चर्चा करणे हा आहे.
सोहा सांगते, वयाची पंचेचाळीशी गाठल्यावर माझ्या शरीरात, हार्मोन्समध्ये, त्वचेत, केसांमध्ये आणि मानसिक आरोग्यात अनेक बदल जाणवू लागले. मला मदतीची गरज आहे, हे लक्षात आल्यावर मी थेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, स्त्री रोगतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मदत घेतली आणि त्यातून मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. या पॉडकास्टमध्ये मलायका अरोरा, करिना कपूर -खान, स्मृती इराणी आणि सनी लिओनी यांसारख्या सेलिब्रिटींसोबतच तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. या प्रवासात सोहाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
जैविक रचना : सोहाच्या मते, स्त्रिया आणि पुरुष समान असले, तरी त्यांची शारीरिक रचना वेगळी आहे. महिलांचे हार्मोनल सायकल 28 दिवसांची असते, तर पुरुषांचे फक्त 24 तासांची. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
स्वतःबद्दलची संवेदनशीलता : आपल्या शरीरातील बदलांना स्वीकारून आपण स्वतःबद्दल अधिक संवेदनशील आणि दयाळू असायला हवे, असे ती सांगते.
पालकत्व आणि संवाद : सोहाने तिच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत मुलांशी मोकळेपणाने बोलणे किती आवश्यक आहे. सोहा तिची मुलगी इनायाच्या संगोपनाबद्दलही मोकळेपणाने बोलते.