‘दिल को करार आया' फेम गायक यासेर देसाई सह अन्य दोघांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. यासेरचा एक व्हीडियो व्हायरल झाला आहे ज्यात तो वांद्रे वरळी सी लिंकवर स्टंटबाजी करताना दिसतो आहे. या सी लिंकच्या काठावर उभे राहून त्याने हा व्हीडियो शूट केला आहे. त्याच्यासोबतच्या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार, सोशल मीडिया पोस्टच्या आधारे सीसी टीव्ही फुटेज शोधले असता ही स्टंटबाजी आढळून आली. या व्हीडियोमध्ये दिसते आहे की व्हीडियोतील व्यक्ती सी लिंकवर पोहचून पुलाच्या काठावर उभी राहते
त्याच्यासोबतचे बाकी दोन लोक त्याचा स्टंट रेकॉर्ड करू लागतात. त्यानंतर ते तिघेही कारमधून निघून जातात.
सी लिंकच्या सीसी टीव्हीमधून या फुटेजची खात्री पोलिसांनी केली आहे. यासेरने मंगळवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार केला. पोलिस यामागाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा स्टंट कोणत्या म्युझिक व्हीडियोसाठी केला गेला आहे की गायकाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता का? याचा पोलिस शोध घेत आहेत.
यासेर विरोधात भारतीय दंड विधानातील कलम 285 (सार्वजनिक मार्ग किंवा येण्या जाण्यास अडथळा निर्माण करणे), 281 (सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे गाडी चालवणे), 125 (स्वत:चे आणि इतरांचे आयुष्य धोक्यात येईल असे वर्तन करणे), 184 (रॅश ड्रायव्हिंग) या नुसार तक्रार दाखल केली आहे.
यासेर सध्या रुठा मेरा इष्क या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गोल्ड, ड्राइव , सुकून आणि शादी मे जरूर आना या सिनेमातील गाण्यासाठी त्याने पार्श्वगायन केले आहे.