मुंबई : आपल्या मखमली आवाजाने आणि वेदनेलाही सुरेल करणाऱ्या गायकीने गेल्या दशकाहून अधिक काळ कोट्यवधी दिलांवर राज्य करणारा गायक अरिजित सिंग याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. "तुम ही हो" पासून सुरू झालेला हा प्रवास एका वळणावर येऊन थांबला असून, अरिजितने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अरिजितने घेतलेल्या या निर्णयामुळे संगीत विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
अरिजितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांशी संवाद साधताना ही बातमी शेअर केली. त्याने लिहिले की, "नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. श्रोते म्हणून तुम्ही मला या वर्षांमध्ये जे प्रेम दिले, त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. मी आज एक महत्त्वाची घोषणा करू इच्छितो की, यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामे स्वीकारणार नाही. मी या प्रवासाचा निरोप घेत आहे. हा प्रवास खरोखरच विलक्षण आणि सुखद होता."
आपल्या लाडक्या गायकाच्या निवृत्तीच्या बातमीने चाहते निराश झाले असले, तरी अरिजितने एक आशेचा किरणही दाखवला आहे. त्याने स्पष्ट केले की, जरी तो चित्रपटांसाठी गाणे थांबवत असला, तरी संगीत निर्मिती सोडणार नाही. "माझ्याकडे काही जुन्या कामांची वचनबद्धता शिल्लक आहे, ती मी पूर्ण करेन. त्यामुळे या वर्षात माझी काही गाणी प्रदर्शित होतील. एक गोष्ट स्पष्ट करतो की, मी संगीत बनवणे कधीही थांबवणार नाही," असे त्याने आवर्जून नमूद केले.
२०१३ मध्ये 'आशिकी २' पासून अरिजित सिंग हे नाव भारतीय घराघरात पोहोचले. प्रेम असो, विरह असो वा भक्ती, प्रत्येक भावनेला अरिजितच्या आवाजाचा स्पर्श लाभला. आता तो 'प्लेबॅक'च्या झगमगाटातून बाहेर पडून एका नवीन, स्वतंत्र सांगीतिक प्रवासाकडे वळत असल्याने, भारतीय चित्रपट संगीतातील एका सुवर्ण युगाचा अंत झाल्याची भावना त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.