पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित सिकंदर चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस उलटून गेले आहेत. तरीही हा चित्रपट काही फारशी कमाल करू शकलेला नाही. 'सिकंदर’ चित्रपटाने सलमान खान आणि निर्मात्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
सलमान खानचा चित्रपट ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थाने ‘सिकंदर’ ठरू शकलेला नाही. दिवसेंदिवस या चित्रपटाची कमाई सतत घटत चालली आहे.
सलमान खानच्या ‘सिकंदर’ने ११व्या दिवशी फक्त ८८ लाख रुपये कमावले आहेत. सिकंदरने आतापर्यंत एकूण १०६.६३ कोटी रुपयेच कमावले आहेत. आता दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घसरण होत चालली आहे. अशीच घसरण चालू राहिली तर लवकरच या चित्रपटाला थिएटरमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
‘सिकंदर’ या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे २०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. मात्र आतापर्यंत या चित्रपटाने केवळ १०० कोटींच्या आसपासच कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सलमान खानच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील होताना दिसतोय. हा चित्रपट आता आपलं बजेट सुद्धा वसूल करण्याची शक्यता कमी आहे.
अभिनेता सनी देओलचा चित्रपट ‘जाट’ १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता सलमान खानच्या ‘सिकंदर’ला सनीच्या चित्रपटाशी टक्कर द्यावी लागणार आहे. अशातच चित्रपटगृहांमध्ये अजूनही ‘छावा’ हा चित्रपट सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करणं सलमानच्या चित्रपटाला अधिकच कठीण होणार आहे.
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात रश्मिका मंदाना, सत्यराज यांसारखे तगडे दक्षिण भारतीय कलाकार झळकले आहेत. याशिवाय, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन आणि काजल अग्रवाल यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. इतकी मोठी स्टारकास्ट असूनही ती या चित्रपटाला वाचवू शकली नाही.