लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार  Instagram
मनोरंजन

बघूया कोण कुणाला पडतंय भारी! अतरंगी कार्यक्रम 'शिट्टी वाजली रे' लवकरच

Shitti Vajali Re Show | लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ दिसणार होस्टच्या भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाह एक भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे शिट्टी वाजली रे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात शिट्टीला महत्त्वाचं स्थान आहे. लहानपणी खेळणं म्हणून मिळालेली शिट्टी नकळतपणे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जाते. त्यामुळेच कुक्करची शिट्टी एखाद्या गृहिणीसाठी जितकी खास असते तितकीच ट्रॅफिक रोखणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांसाठी देखील.

शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. कारण कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे.

सहजरित्या आपल्या अभिनयाने मनं जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का, याची पोलखोल शिट्टी वाजली रे चा मंच करणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना अमेय वाघ म्हणाला, ‘शिट्टी वाजली रे कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर मी टीव्ही विश्वात पुनरागमन करतोय. सुरुवातीच्या काळात मी गोष्ट एका जप्तीची नावाच्या मालिकेत काम केलं होतं. जवळपास १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा वाहिनीसोबत काम करण्याचा योग जुळून आला आहे.

''मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. त्यामुळे शिट्टी वाजली रे कार्यक्रमासाठी विचारणा झाली तेव्हा तातडीने होकार दिला. मला आणि माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक येत नव्हता मात्र लॉकडाऊनमुळे आम्ही दोघंही स्वयंपाक करायला शिकलो. तेव्हापासून मला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. कुणी विश्वास ठेवणार नाही मात्र मी आता नियमित स्वयंपाक बनवतो. यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट मला कळली ती म्हणजे आपली आई, मावशी, काकू, बहिण, पत्नी ज्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात, घरासाठी राबतात त्यांचं किती कष्टाचं काम आहे याची जाणीव मला झाली. शिट्टी वाजली रे कार्यक्रमात अनेक कलाकार सामील होणार आहेत. त्यांच्यासोबतची धमाल-मस्ती या मंचावर अनुभवता येणार आहे. मी या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुक आहे.'' अशी भावना अमेय वाघने व्यक्त केली.

या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. शिट्टी वाजली रे २६ एप्रिल पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT