Swami Aaicha Gondhal: पद्मश्री शंकर महादेवन यांच्या दमदार आवाजाने सजलेले ‘स्वामी आईचा गोंधळ’ हे भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. स्वामीआई फिल्म्सच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या गीतातून स्वामी समर्थांच्या आदिशक्ती स्वरूपाची महती सांगण्यात आली आहे. नवरात्रीतील अष्टमीच्या शुभमुहूर्तावर हे गाणे स्वामीआई फिल्म्सच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित झाले.
या भक्तिगीताचा अनावरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी संगीतकार स्नेहल-स्वप्नील, गीतकार मंदार इंगळे, निर्माते अमित बहिरट, दिग्दर्शक हर्षवर्धन जाधव आणि कथा-पटकथा लेखक ओंकार मरकळे यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.
पारंपरिक गोंधळाला आधुनिक संगीताची जोड देण्यात आली आहे. या गाण्याच्या माध्यमातून भक्ती आणि श्रद्धेसोबतच माणुसकी, नात्यांमधील जिव्हाळा आणि स्त्रीचा सन्मान यांचा संदेश देण्यात आला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण वाढत असून, त्याचा जवळच्या माणसांशी असलेल्या नात्यांवरही परिणाम होतो. याचे चित्रण गाण्याच्या व्हिडीओमध्ये करण्यात आले आहे. कठीण प्रसंगी स्वामी समर्थ वेगवेगळ्या रूपांतून मदतीला येतात, हा श्रद्धेचा भावही यातून मांडण्यात आला आहे.
या गाण्यात मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी अक्षय वाघमारे आणि प्रतीक्षा मुणगेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी दिग्दर्शन केले असून, ओंकार मरकळे यांनी कथा, पटकथा आणि क्रिएटिव्ह हेडची जबाबदारी सांभाळली आहे. गीताचे संगीत स्नेहल-स्वप्नील यांनी दिले असून, मंदार इंगळे यांनी गीतलेखन केले आहे. अमित राजेंद्र बहिरट यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून मिळणारा आर्थिक लाभ गरजू मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. निर्माते अमित बहिरट यांनी ही माहिती देताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले.
भक्ती आणि सामाजिक कार्य यांची सांगड घालण्याच्या उद्देशाने स्वामीआई फिल्म्सची स्थापना करण्यात आली आहे. ‘स्वामी आईचा गोंधळ’ ही या संस्थेची पहिली निर्मिती असून, यापुढेही आशयपूर्ण गीते आणि चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे.