पुढारी ऑनलाईन डेस्क - वयाची साठी गाठायला आली असतानाही शाहरुख खान प्रत्येकाच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता ठरला आहे. आज 'किंग खान'ने अनेक दशकांच्या मेहनतीने आपले वलय बॉलिवूड इंडस्ट्रीवर निर्माण केले आहे. दिल्लीतील एका सामान्य घरातील तरुण हिंदी चित्रपटसृष्टीत इथवर मजल मारेल, असे कुणालाही वाटले नव्हते. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज शाहरुख खानची लक्झरी लाईफ सर्वांनाच चकित करणारी ठरलीय. मुंबईत आल्यानंतर शाहरुख खानला राहण्यासाठीही जागा नव्हती, पण स्वभळावर त्याने त्याच मायानगरीत राजवाड्यासारखा बंगला 'मन्नत' उभारला. आज शाहरुख खानचा वाढदिवस..जाणून घेऊया मन्नत बंगल्या विषयी.
मन्नत हे ७ स्टार लक्झरी हॉटेलपेक्षा कमी नाही. पण मन्नत या इमारतीचे पूर्वीचे नाव होते- व्हिला व्हिएन्ना. शाहरुखने मन्नत बंगला बांधला नाही. शाहरुखने ही इमारत नरिमन दुबाश नावाच्या गुजराती व्यक्तीकडून विकत घेतली होती. शाहरुख मन्नतच्या शेजारी राहत होता, जेव्हाही तो 'विला व्हिएन्ना' जवळून जात असे तेव्हा त्याच्या मनात नेहमी हा विचार असायचा की एक दिवस मी हे घर घेईन. काळानुसार ते घडत गेले आणि हा बंगला मिळवण्यासाठी शाहरुखने खूप प्रयत्न केले. नरिमन दुबाश यांना हे घर विकायला सांगण्यासाठी शाहरुखला खूप मेहनत घेतली. रिपोर्टनुसार, शाहरुखने २००१ मध्ये ही इमारत १३ कोटी रुपयांना विकत घेतली होती.
आज त्याची किंमत २०० कोटी रुपये आहे. शाहरुखने २००५ मध्ये नरिमन दुबाशच्या व्हिला व्हिएन्नाचे नाव बदलून मन्नत केले होते.
मन्नत बंगल्यामध्ये आतापर्यंत बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. ते कोणते चित्रपट पाहूया.
माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' चित्रपटाचे शूटिंग 'मन्नत'मध्येही झाले आहे. रिपोर्टनुसार, 'मन्नत'मध्ये 'तेजाब'चे शूटिंग झाले तेव्हा अभिनेता त्या बंगल्याचा मालक नव्हता. हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'तेजाब'मधील 'एक दो तीन' गाण्याचा काही भाग 'मन्नत'मध्ये शूट करण्यात आला होता. चित्रपटातील 'मन्नत' हे माधुरी दीक्षितचे घर होते, ज्यामध्ये ती तिचे वडील अनुपम खेर यांच्यासोबत राहते. त्यावेळची 'मन्नत' आणि आताची 'मन्नत' ची डिझाईन अगदी सारखीच आहे,
शाहरुख खानवरच चित्रीत करण्यात आलेला चित्रपट 'फॅन' चे 'मन्नत'मध्ये शूटिंग करण्यात आले होते. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसला होता. चित्रपटात अशी काही दृश्ये होती, ज्यात सुपरस्टार आर्यनची झलक पाहण्यासाठी चाहता गौरव 'मन्नत'च्या बाहेर उभा असलेला दिसतो. आर्यनला भेटण्यासाठी तो आत डोकावून पाहतो. 'फॅन' चित्रपटाचा तो सीन अगदी खरा होता आणि त्याच वेळी शूट करण्यात आला होता, जेव्हा शाहरुखला पाहण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर एवढी गर्दी जमली होती.
मात्र, त्याच्याच घरात 'मन्नत' चित्रपटाचे शूटिंग करणे शाहरुखसाठी सोपे नव्हते. त्यासाठी त्याला परवानगी देण्यात आली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी शाहरुखला त्याच्याच घरात चित्रपटाचे शूटिंग करू देण्यास नकार दिला. त्यावेळी 'मन्नत'च्या बाहेर फक्त गर्दीचा सीन शूट करण्यात आला होता.
'येस बॉस' चित्रपटातील 'बस इतना सा ख्वाब है' गाण्यात 'मन्नत'ची झलक पाहायला मिळते. पण त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गाणं आणि 'मन्नत'चं कनेक्शन. वास्तविक 'येस बॉस' १९९७ मध्ये आला होता आणि त्यावेळी शाहरुखकडे 'मन्नत' नव्हता. ते फक्त त्याचं स्वप्न होतं. त्यावेळी शाहरुखने ठरवले होते की, एक दिवस तो हा बंगला (मन्नत) विकत घेईल. त्यावेळी शाहरुख खान एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. शाहरुख जेव्हा 'मन्नत' समोर 'बस इतना सा ख्वाब है' गाणे गाऊन बाहेर पडतो तेव्हा ते दृश्य पाहून त्याला वाटते की स्वप्ने खरोखरच पूर्ण होतात.