पुढारी ऑनलाईन डेस्क : एकेकाळी बॉलीवूडची सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी शाहिद कपूर आणि करीना कपूर हे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आयफा (IIFA) अवॉर्ड्स दरम्यान पिंक सिटी जयपूरमध्ये दोघेही एकत्र दिसले. त्यांच्या या भेटीने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. शाहिद आणि करीना एका विशेष कार्यक्रमादरम्यान स्टेजवर आले, जिथे त्यांनी हलक्या-फुलक्या गप्पा मारल्या आणि नंतर एकमेकांना प्रेमाने मिठीही मारली. हा क्षण पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. दोघांसोबत मंचावर निर्माता करण जोहर आणि अभिनेता कार्तिक आर्यन देखील होते, जे या भव्य पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत आहेत.
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ या आयकॉनिक चित्रपटामुळे शाहिद आणि करीना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अमर झाली. करीना कपूरच्या चुलबुली 'गीत' आणि शाहिदच्या शांत-संयमी 'आदित्य'च्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या त्या काळातील अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चांनीही बॉलीवूड गजबजून गेले होते. आता, आयफा 2025 मध्ये पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
करीना आणि शाहिद यांनी २००४ ते २००७ पर्यंत एकमेकांना डेट केले. दोघांनीही फिदा, चुप चुप के आणि जब वी मेट सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'जब वी मेट' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले आणि काही वर्षांनी अभिनेत्रीने सैफ अली खानशी लग्न केले. शाहिदच्या आयुष्यात मीराचा प्रवेश झाला. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. आयफा २०२५ मध्ये शाहिद आणि करीना वेगवेगळे परफॉर्मन्स देणार आहेत.
करिनासोबत झालेल्या भेटीनंतर शाहिदने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये तो म्हणाला. "आमच्यासाठी हे काही नवीन नाही. आज स्टेजवर भेटलो, तसंच कधी ना कधी कुठेतरी भेटतच असतो. पण आमच्यासाठी हा एक अविस्मरणीय क्षण होता. जर लोकांना यात काही खास वाटलं, तर तेच आमच्यासाठीही खास आहे."