Salman Khan Rajpal Yadav Controversy: मुंबईत झालेल्या स्क्रीन अवार्ड 2026 दरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता राजपाल यादववर केलेल्या एका टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला, तर या संपूर्ण प्रकरणात सलमान खानने एन्ट्री करत राजपाल यादवला उघडपणे पाठिंबा दिला आहे.
या अवॉर्ड शोमध्ये सौरभ द्विवेदी होस्ट करत होते. त्यांनी राजपाल यादवच्या सुरू असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणाचा संदर्भ देत हलक्याफुलक्या शैलीत टिप्पणी केली. “राजपाल भाई, डॉलर वर-खाली झाला असला तरी तुम्हाला तेवढेच पैसे परत करावे लागतील,” असे म्हणत प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट उसळली. स्वतः राजपाल यादवही त्या क्षणी हसताना दिसला.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजपाल म्हणाला की, “एकदा माझं म्हणणं तरी ऐका, मला माझं म्हणणं मांडायचं आहे.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. काहींनी ही टिप्पणी असंवेदनशील असल्याचं म्हटलं, तर काहींनी याला फक्त विनोद म्हणून घेतलं.
या पार्श्वभूमीवर सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करत राजपाल यादवच्या कामाचं कौतुक केलं. त्याने लिहिलं की, “राजपाल भाई, तुम्ही ३० वर्षांपासून काम करत आहात. आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहिलं कारण तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहात आणि एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.”
सलमानने पुढे असंही स्पष्ट केलं की परिस्थिती काहीही असो, राजपालला काम मिळत राहील. “डॉलर वर गेला किंवा खाली आला, तरी त्याचा काही फरक पडत नाही. काम तुम्हाला मिळतच राहील,” असं सांगत त्याने राजपालला मनापासून काम करत राहण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, या वादावर पडदा टाकत राजपाल यादवने स्वतः एक व्हिडिओ शेअर केला. त्याने स्पष्ट केलं की हा सगळा प्रकार मजेत झाला असून शोचे होस्ट त्याच्या लहान भावासारखे आहेत. त्यामुळे कोणताही गैरसमज असण्याचं कारण नाही, असं त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं.
या वर्षीच्या अवॉर्ड सोहळ्यात 'धुरंधर' या चित्रपटाने सर्वाधिक १४ पुरस्कार जिंकत आपला दबदबा दाखवला. एकूणच, छोट्याशा विनोदातून सुरू झालेलं हे प्रकरण मोठ्या चर्चेचं कारण बनलं आहे. मात्र सलमान खानच्या पाठिंब्यामुळे आणि राजपाल यादवच्या स्पष्टीकरणामुळे हा वाद आता निवळल्याचं दिसत आहे.