Sayara actor Ahan Pandey next film:
नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये 'सैयारा' चित्रपटातून दमदार पदार्पण करणारा अभिनेता अहान पांडे लवकरच त्याच्या पुढील चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोहित सूरीच्या या चित्रपटामुळे अहान रातोरात स्टार बनला आणि तेव्हापासून त्याचे चाहते त्याच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक होते.
आता अहानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. अहान पांडे लवकरच दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, या चित्रपटात त्याची नायिका म्हणून शरवरी वाघ हिची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बिज एशिया लाईव्हच्या वृत्तानुसार, यशराज फिल्म्सच्या या बहुचर्चित चित्रपटात शरवरी वाघ मुख्य भूमिकेत अहान पांडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
शर्वरीने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला २०२१ मध्ये कबीर खानच्या 'बंटी और बबली २' या चित्रपटातून सुरुवात केली होती, ज्यात तिने राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदीं सोबत स्क्रीन शेअर केली होती. शरवरी सध्या 'अल्फा' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून यात तिच्यासोबत आलिया भट्ट देखील आहे. 'अल्फा' २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त, ती 'चांदनी बार 2' मध्येही मुख्य भूमिका साकारू शकते.
दिग्दर्शक अली अब्बास जफर सध्या आदित्य चोप्रासोबत एका ॲक्शन रोमान्स चित्रपटावर काम करत आहेत. अली यांनी 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सूत्रांनी सांगितले की, "अली आपल्या मूळ शैलीतील ॲक्शन रोमान्सकडे परत जाऊ इच्छित होते. त्यांनी 'सैयारा' मध्ये अहान पांडेचा भावनिक आणि नाट्यमय अभिनय पाहिला आणि ते खूप प्रभावित झाले. अहानमध्ये त्यांना आपल्या पुढील चित्रपटाचा नायक दिसला."
या चित्रपटासाठी अहानची निवड होण्यामागे आदित्य चोप्रा यांचा मोठा हात आहे. एका नवीन चेहऱ्यामुळे प्रेक्षकांना एक 'सरप्राइज एलिमेंट' मिळेल, असे आदित्य चोप्रा यांचे मत होते. 'सैयारा' स्टारचा कमी 'एक्सपोजर' हीच त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांची त्याच्या पुढील चित्रपटांबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.