पुढारी ऑनलाईन डेस्क - जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ट्रेलर पार पडला. चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
"भामिनी"चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय. कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकचं नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते.
'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान"ची पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. "संगीत मानापमान!" चित्रपट १० जानेवारी पासून चित्रपटगृहात पाहता येईल.