Samantha Ruth Prabhu Mobbed: प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू रविवारी हैदराबादमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. मात्र त्या कार्यक्रम स्थळी लोकांची गर्दी एवढी वाढली की समांथाला पुढे जाणं खूपच कठीण झालं. ही घटना जुबली हिल्स भागातील एका व्यावसायिक आऊटलेच्या ओपनिंगवेळी झाली. या कार्यक्रमाला समांथा ही मुख्य पाहुणी म्हणून आमंत्रित होती.
सध्या सोशल मीडियावर समांथाला पाहण्यासाठी झालेल्या या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत समांथाला चाहत्यांनी फोटोग्राफ काढण्यासाठी अक्षरशः घेरल्याचं दिसून येतं. दरम्यान, समांथा या ठिकाणावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. सुरक्षा रक्षक समांथाला एस्कॉट करत होते.
मात्र चाहत्यांची इतकी गर्दी होती की समांथाला तिच्या गाडीपर्यंत पोहचेपर्यंत अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, या घटनेवेळी कोणाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. तसंच समांथानं या घटनेवर कोणताही सार्वजनिक कमेंट देखील केलेली नाही.
समांथाच्या बाबतीत हैदराबादमधील ही घटना अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्या बाबतीत झालेल्या घटनेनंतर झाली आहे. गेल्या आठवड्यात निधी अग्रवाल ही एका प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी जमावानं तिला घेरलं होतं. अन् काहींनी तिच्यासोबत वाईट वर्तनुक देखील केली होती. अखेर निधी कशीबशी तिच्या गाडीजवळ पोहचली.
हैदराबादमधील घटना देखील जवळपास तिशीच होती. समांथा ही तेलुगू स्टार असल्यानं हैदराबादमध्ये तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. समांथा वरचेवर हैदराबादमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावत असते. दरम्यान, रविवारी झालेल्या घटनेनंतर आयोजकांनी अजूनपर्यंत गर्दी अन् निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीबाबत कोणतंही वक्तव्य प्रसिद्ध केलेलं नाही.