हैदराबादमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला चाहत्यांच्या प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागला. साडी शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी समंथा आली होती. तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अभिनेत्री गर्दीत अडकली.
कार्यक्रमस्थळी अनेक चाहते समंथाच्या अतिशय जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या सुरक्षारक्षकांनी कसाबसा घेरा तयार करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात समंथा अनेक वेळा लडखडली, काही वेळा तिची साडीही ओढली गेल्याचा प्रकार घडला. धक्काबुक्कीत स्वतःला सावरत ती मंचापर्यंत पोहोचली.
कार्यक्रमानंतर तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत एक क्रिप्टिक (अप्रत्यक्ष) पोस्ट लिहिली. ती म्हणाली की, “अॅक्शनने भरलेल्या शूटिंग शेड्यूलनंतर, जखमा, रक्त आणि वेदना सहन करूनही, परिस्थिती पाहता आम्ही स्वतःला आश्चर्यकारकरीत्या चांगल्या पद्धतीने सावरले.”
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निधी अग्रवाल हिलाही हैदराबादमध्ये अशाच प्रकारच्या वर्तनाला सामोरे जावे लागले होते. प्रभासचा आगामी चित्रपट ‘द राजा साब’च्या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये निधी उपस्थित होती. निधी अग्रवालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गायिका व अभिनेत्री चिन्मयी श्रीपदा हिने संताप व्यक्त केला होता. “लांडग्यांपेक्षाही वाईट वागणूक देणार्या पुरुषांचा कळप. खरं तर लांडग्यांचा अपमान का करावा? अशी एकसारखी मानसिकता असलेले पुरुष जेव्हा गर्दीत एकत्र येतात, तेव्हा ते एखाद्या महिलेला अशाच पद्धतीने त्रास देतात. एखादा देव त्यांना उचलून दुसर्या ग्रहावर पाठवेल का?”