Saif Ali Khan Death Threat: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमकीचा कथित ऑडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अजून अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे ज्याचा हात होता त्यानेच सैफ अली खानला धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. झीशान अख्तरने ही धमकी दिल्याचे बोलले जात आहे. वरील माहिती मुंबई पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार कपूर आणि आयुषमान खुराणा यांना देखील या महिन्यात अशाच प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. दोन्ही केसमध्ये पोलिसांनी वैभव मिश्राला या आयआयटी ग्रॅज्युएटला बंगळुरूमधून अटक केली होती. मिश्राची कोणत्याही गुन्हेगारी विश्वातील गँगशी कनेक्शन नाही. त्याने ही धमकी देण्यासाठी AI चा वापर केला होता.
सैफ अली खानला देण्यात आलेल्या धमकीत दोन वर्षापूर्वी त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वतः झीशान अख्तर असलेल्या जावा करणाऱ्याने सैफ अली खानला 'तुझ्या पत्नीने करीना कपूरने जी चूक केली आहे तिची शिक्षा तुला भोगावी लागू शकते. यापूर्वी देखील चाकू लागला होता ना.. त्यावेळी परमेश्वराच्या कृपेमुळे वाचलास. आता गोळी असेल अन् तुझी देखील बाबा सिद्दीकी सारखी स्थिती होऊ शकते अशी धमकी दिली.'
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांना तीन हल्लेखोरांनी झीशन सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घातल्या होत्या. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील बांद्रा इस्ट भागात हा गोळीबार झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले होते.
या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगमधील लॉरेन्सचा छोटा भाऊ अनमोल याला गेल्या वर्षी अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आले होते. त्यानंतर त्याला राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने अटक केली. तो सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे.