पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या प्रकृतीविषयी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने महत्त्वाची माहिती दिली. देवाच्या कृपेने सैफ अली खानची तब्येत आता व्यवस्थित आहे. त्याला आता कोणताही धोका नाही. सैफला आज आयसीयूतून स्पेशल रुममध्ये हलवण्यात आले आहे. पण पाठीवरील खोल जखमेमुळे त्याला बेड रेस्टची गरज आहे, असे लीलावती रुग्णालयाचे चीफ न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी शुक्रवारी (दि.१७) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
''सैफ अली खान यांची तब्येत आता सुधारली आहे. आता त्याच्या तब्येतीला धोका नाही. पण त्याच्या पाठीवर खोल जखम असल्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. सर्व जखमांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याला सध्या कोणालाही भेटू दिले जात नाही, जेणेकरून त्यांची तब्येत लवकर बरी होईल. सैफ अली खान यांची तब्येत एकदम छान आहे. त्याला आज चालवण्यात आले. त्याला आज आयसीयूतून स्पेशल रुममध्ये आणण्यात आले. त्यांच्या पाठीत सापडलेला धातू तपासणीसाठी पाठवला आहे. त्याला पॅरालाइजचा कोणताही धोका नाही. पण त्याच्या पाठीवर खोल जखम असल्याने इन्फेक्शन होऊ शकते आहे.'' असे डॉ. डांगे म्हणाले.
सैफ याच्या प्रकृतीत सुधारणा पाहून त्याला घरी सोडण्यात येईल. त्यांची प्रकृती पाहून पोलीस एजन्सी त्यांचा जबाब घेऊ शकते. त्याला न्यूरॉलॉजिकल काहीच अडचण नाही, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. नितीन डांगे पुढे म्हणाले, "त्यांच्या हाताला दोन आणि एक मानेला जखम झाली आहे. जी प्लास्टिक सर्जरीने बरी करण्यात आली आहे. त्याच्या पाठीचा मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून मणक्यातील एक धारधार वस्तू बाहेर काढली आहे. सैफ आता बोलू लागला आहे. तसेच तो हालचाल करू लागला आहे. आम्ही त्याला चालायला लावले आणि तो व्यवस्थित चालला."
वांद्रे येथील ११ व्या मजल्यावरील आलिशान घरात गुरुवारी पहाटे घुसून एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack News) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात सलग दोन मोठ्या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, हा चोरीचा प्रयत्न होता, असे खान कुटुंबीयांनी आणि पोलिसांनीही म्हटले असले; तरी सैफच्या घरात झालेल्या झटापटीतही या अज्ञात हल्लेखोराने सैफकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जात असल्याने या चोरीच्या प्रयत्नाला आता खंडणीचे वळण लागले असून, या हल्ल्याने बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली.