पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री चाकुहल्ला झाला असून या प्रकरणात पोलिसांनी शोधमोहिमेला गती दिली आहे. आता सैफ राहत असलेल्या आसपासच्या १५ इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. यात सैफच्या घरात काम करणारे आचारी, सुरक्षा रक्षक आणि हेल्परचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा आरोपी पूर्वी सैफचा मुलगा तैमूर झोपत असलेल्या बेडरूममध्ये शिरला याच खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. हल्लेखोराने यातील एका महिला कर्मचाऱ्याला आधी शांत राहण्यास सांगून धमकावले, तसेच १ कोटी रुपये मागितले. दरम्यान दुसऱ्या महिला कर्मचार्याने आरडा ओरडा केल्यानंतर तिच्यावर हल्ला केला.
पोलिसांनी या इमारत परिसरातले सीसीटिव्हींचे ३ डिव्हीआर तपासणीसाठी आणले आहेत. खोलीत ज्या ठिकाणी झटापट झाली त्या खोलीतही सीसीटिव्ही आहे मात्र हा सीसीटिव्ही बंद असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी चौथ्या माळ्यापर्यत शिड्यांनी गेला, तिथून डकची जाळी तोडून तैमुरच्या खोलीतील गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सैफच्या घराला इलेक्ट्रीक लॉक असल्याने बाहेरून दरवाजा उघडता येत नाही मात्र आतून उघडता येतो.