पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अलि खान याच्यावर १६ जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्याकडून हल्ला झाला होता. याप्रकरणी हल्लखोर आरोपी मोहम्मद शरीफूल इस्लाम या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला असून आरोपी शरीफूल इस्लामच्या बोटांचे ठसे व गुन्हा घडला ते सतगुरु अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर मिळालेले ठसे जुळले आहेत.
‘तीन ठिकाणांहून घेतलेल्या नमून्यांपैकी आठव्या मजल्यावरील जिन्याच्या दरवाजावरील घेतले बोटांच्या ठशांचे नमुने जुळले आहेत. तर उर्वरित दोन ठिकाणांचे ठसे जुळत नाहीत. त्याचबरोबर सैफ अलि खानचे घर, बाथरुमचा दरवाजा, फरशी याठिकाणी मिळालेले ठसेही मॅच होत नाहीत.
याबाबत तपासी अधिकाऱ्याने सांगितले की आठव्या मजल्यावर मिळालेले हाताचे ठसे दरवाजावर जोराने पकडल्याचे आहेत. आरोपी चोरीच्या उद्देशाने पहिल्या मजल्यापासून ११ व्या मजल्यापर्यंत प्रत्येक प्लॅटचा दरवाजा ढकलत होता. यामुळेच ८ व्या मजल्याच्या दरवाजावर त्याच्या बोटांचे ठसे आढळून आले.
दरम्यान ही घटना घडून ८३ दिवसांनी मुंबई पोलिसांनी चार्जशिट दाखल केली आहे. १६ जानेवारी रोजी चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका इसमाने अभिनेता सैफ अलिखान वर हल्ला केला होता. यानंतर सैफवर तातडीची शस्त्रक्रीयाही करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर ३ दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आले होते.