Sachin Pilgaonkar on Sanjeev Kumar
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटाचे हरहुन्नरी अभिनते सचिन पिळगावकर यांनी संजीव कुमार यांच्याबद्दल एक किस्सा सांगितलाय. एका मुलाखतीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बॉलिवूड अभिनेते संजीव कुमार यांनी आयुष्यातील पहिला ऑटोग्राफ कुणाचा घेतला आणि सचिन पिळगावकर यांचा ऑटोग्राफ पहिल्यांदा कुणी घेतला याविषयी एक किस्सा सांगितला आहे. सचिन पिळगावकर यांनी त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया.
सचिन पिळगावकर म्हणाले, माझा पहिला ऑटोग्राफ अशा एका व्यक्तीने घेतला होता, ते मी कधीच विसरु शकणार नाही. विशू राजे हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांना हा माझा मार्ग एकला हा चित्रपट हिंदीमध्ये करायचा होता. तेव्हा मी चौदा-पंधरा वर्षांचा असेन. त्यांना तो चित्रपट संजीव कुमार (हरीभाई जरीवाला) यांच्याबरोबर करायचा होता. त्यांनी एक ट्रायल अजंठा आर्टमध्ये ठेवली होती. हरीभाईंनी तो पूर्ण चित्रपट तिथे पाहिला. सायंकाळचे सात वाजले होते. ते चित्रपट पाहून बाहेर आले. त्यांनी विशूराजेला विचारलं सचिन कुठे राहतो माहिती आहे का? ते म्हणाले, मला माहिती आहे. 'मला घेऊन जाता का त्याच्याकडे'.
''ते म्हणाले हो चला..' ते गाडीत बसले. सांताक्रुझमध्ये एका स्टेशनरी शॉपमध्ये हरीभाईंनी गाडी थांबवली. एक ऑटोग्राफ बुक आणि पेन विकत घेतला. ते घरी आले आणि बेल मारली. वडिलांनी दरवाजा उघडला तर समोर संजीव कुमार उभे होते. ते म्हणाले, 'हरीभाई आतमध्ये या..' 'सचिन आहे का?' 'मी आलो.' ते म्हणाले, 'मी आताच हा माझा मार्ग एकला चित्रपट पाहून आलोय. मी आयुष्यात कोणाचा ऑटोग्राफ घेतला नाही. आयुष्यातील पहिला आटोग्राफ तुझा हवाय.' ''माझ्यासमोर त्यांनी बुक ठेवलं. पेन दिला. मी त्यांना ऑटोग्राफ दिला. मी लिहिलं, हरीभाऊ विथ लव्ह.. सचिन.. ती ऑटोग्राफ मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.''
पिळगावकर म्हणाले, मी आयुष्यातील पहिला ऑटोग्राफ घेतला तेव्हा खूप लहान होतो. माझ्याकडे त्याकाळी ऑटोग्राफ बुक वगैरे काही नव्हतं. मी अभ्यास करण्यासाठीची वही घेऊन गेलो होतो. राजकमल स्टुडिओमध्ये शूटिंग सुरु होतं. मी टॅक्सीतून बाहेर पडलो आणि स्टुडिओमध्ये गेलो. मी मधुबाला यांना मधू आंटी म्हणून हाक मारली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी गेलो आणि मिठीच मारली. मी म्हटलं मधुआंटी एक मिनिट. मी पुस्तक आणि पेन काढला आणि म्हटलं एक ऑटोग्राफ द्या. त्या म्हणाल्या, तुला पाहिजे माझा आटोग्राफ. त्यांनी आटोग्राफ दिला. आटोग्राफ देताना मी खाली पाहिलं. मला त्यांचे पाय इतके सुंदर दिसले. ती बाई जितकी सुंदर होती, त्याच्या १० पटीने त्या बाईचे पाय सुंदर होते. असे पाय मी आयुष्यात कधीही बघितले नाहीत. त्या म्हणाल्या कुठे शूटिंग सुरु आहे, मी येते तिकडं. त्यानंतर ब्रेकमध्ये त्या आल्या. आम्ही सोबत बसलो. मात्र, मी घेतलेला त्यांचा तो पहिला ऑटोग्राफ होता, जो मी माझ्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा घेतला होता.