नागराज मंजुळेंच्या हस्ते 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च  Instagram
मनोरंजन

Marathi Movie | नागराज मंजुळेंच्या हस्ते 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

नागराज मंजुळेंच्या हस्ते 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे "स ला ते स ला ना ते" हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे लॉन्च करण्यात आला. दमदार स्टारकास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीचे कुतूहल आता आणखी वाढवले आहे.

अतिशय बडबड करणारा, गोडबोलू तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते. या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोहोचतात. हा तरुण विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो. पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पत्रकारिता, पर्यावरणाचे प्रश्न, विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत. पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते. त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो. अशाच एका जुगाडात तो कसा अडकत जातो आणि त्याच्यावर काय आपत्ती ओढवते, असं या चित्रपटाचं कथानक असल्याचं ट्रेलरवरून जाणवतं.

पत्रकारिता समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, व्यवस्था सुधारण्यासाठी असते. मात्र, पत्रकारितेतील अप्रवृत्ती, राजकारण यांचा संबंध 'स ला ते स ला ना ते' चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. अत्यंत लक्षवेधी, गुंतवून ठेवणारा हा ट्रेलर आहे. त्यामुळेच टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नागराज मंजुळे म्हणाले, आजपर्यंत न हाताळलेला विषय या चित्रपटात मांडलेला आहे. अतिशय रंजक आणि रहस्य्मय असा हा ट्रेलर झाला आहे. सगळ्याच कलाकरांचा अभिनय उत्तम झाला आहे.

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे.

'स ला ते स ला ना ते' हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरुपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT