Nightingale of the South किळीये किळीये सारखी तमीळ गाणी आज रिल्सवर ठेवणाऱ्या तरुण पिढीपासून वृद्धांपर्यंत अनेकांना त्यांचा आवाज आवडतो, पण अनेकांना त्यांच्याविषयी माहिती नसेल. पण या गायिकेला म्हणत होते दक्षिणेतिल गान कोकीळा. त्यांचे नाव होते एस. जानकी काल त्यांचे वृद्धापकाळाने म्हैसूर येथे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या आजारांमुळे त्यांच्यावर म्हैसूरच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२० भाषांमध्ये ४८ हजारहून अधिक गाणी
अनेकांच्या ओठावर आजही त्यांनी गायलेली गाणी देशभरात, जरी त्यांची प्रमुख गायकी दक्षिणेत झाली असली तरी त्यांनी देशभरातील विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. एस. जानकी यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ४८,००० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय भाषांमध्ये काम केले, पण त्या व्यतिरिक्त अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्येही गाणी गायली.
सुरुवातीचे जीवन आणि संगीत प्रवास
एस. जानकी या एक प्रतिभावान गायिका, गीतकार आणि संगीत दिग्दर्शिका होत्या. त्यांनी कन्नड, तेलगू, तमिळ, मलयम आणि हिंदी अशा विविध भाषांमधील हजारो गाण्यांना आपला मधुर आवाज दिला. त्यांचा जन्म १९३८ मध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका लहान गावात झाला. बालपणापासूनच संगीताची आवड असलेल्या जानकी यांनी नादस्वरम विद्वान श्री पैडीस्वामी यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे गिरवले.
कारकिर्दीची सुरुवात
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली. आपल्या काकांच्या सल्ल्यानुसार त्या चेन्नईला आल्या आणि 'एव्हीएम स्टुडिओ' (AVM Studio) मध्ये गायिका म्हणून रुजू झाल्या. त्यांनी सर्वाधिक गाणी कन्नड भाषेत गायली आहेत (अंदाजे १०,००० हून अधिक गाणी). कन्नड सिनेसृष्टीत त्यांना अत्यंत आदराचे स्थान आहे. तसचे मल्याळम आणि तमिळ: या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी हजारो सदाबहार आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी दिली.
हिंदी मधील गाणी आजही लोकप्रिय
व्हर्सटाईल संगितकार बप्पी लाहिरी यांच्या संगितामध्ये त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी गायली आहेत यामध्ये प्यार बिना चैन कहा रे गोरी का साजन साजन की गोरी यासारखी लोकप्रिय गाणी गायली आहेत.
त्यांनी संगीतकार इळयाराजा (Ilaiyaraaja) यांच्यासोबत सर्वाधिक हिट गाणी दिली. तसेच एस. पी. बालसुब्रह्मण्यम (SPB) आणि पी. बी. श्रीनिवास यांच्यासोबतची त्यांची युगलगीते (Duets) आजही अजरामर आहेत. शास्त्रीय संगीत, रोमँटिक गाणी, लोकगीते आणि अगदी लहान मुलांच्या आवाजातील गाणीही तितक्याच ताकदीने गायली.
दिग्गजांसोबतची भागीदारी आणि सन्मान
१९५७ मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या जानकी यांनी पहिल्याच वर्षी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गाण्याचा विक्रम केला. संगीत दिग्दर्शक इळयाराजा आणि प्रख्यात पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केली.
कन्नड चित्रपटसृष्टीत त्यांनी सुपरस्टार डॉ. राजकुमार यांच्यासोबत असंख्य सुपरहिट गाणी गायली. त्यांच्या या अथांग संगीत सेवेसाठी म्हैसूर विद्यापीठाने त्यांना 'गौरव डॉक्टर' (मानद डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना 'कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार' आणि देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला 'पद्मभूषण पुरस्कार' तसेच अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
वैयक्तिक जीवन
१९५९ मध्ये एस. जानकी यांचा विवाह व्ही. रामप्रसाद यांच्याशी झाला. १९९७ मध्ये पतीच्या निधनानंतर त्या हैदराबाद येथे स्थायिक झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्ण पर्व संपले असून संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.