पुढारी ऑनलाईन
राजकीय नेते, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, खेळाडू, हीरो यांच्यावरील बायोपिक आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत; पण आता भारतातील शास्त्रज्ञांचे अर्थात सायन्स हीरोंचे जीवन एका सीरिजच्या निमित्ताने उलगडणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिवने त्यांच्या आगामी 'रॉकेट बॉईज' या सीरिजचा ट्रेलर रीलिज केला.
ही सीरिज होमी जहाँगीर भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेता जिम सर्भ अणुशास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांची भूमिका अभिनेता इश्वाक सिंह याने साकारली आहे.
इश्वाकने यापूर्वी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या 'पाताल लोक'मध्ये काम केले आहे. होमी भाभा आणि विक्रम साराभाई पहिल्यांदा कसे भेटले, त्यांच्यात मैत्री कशी झाली, आणि भारताच्या आण्विक महाशक्ती बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल कसे उचलले गेले, याची झलक ट्रेलरमधून दिसते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मिसाईल मॅन शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याही भूमिका यात असणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन अभय पन्नू यांनी केले आहे.