Robert Pattinson Is Next James Bond जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गुप्तहेर पात्र 'जेम्स बाँड' या भूमिकेसाठी अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन याच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. डॅनियल क्रेगच्या पाच चित्रपटांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर पॅटिनसन आता '007' च्या भूमिकेत दिसणार आहे. या घोषणेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पुढचा जेम्स बाँड कोण असणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
'द बॅटमॅन' आणि 'द ओडिसी' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखला जाणारा रॉबर्ट पॅटिनसन आता ही आयकॉनिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. डॅनियल क्रेगने २००६ मध्ये आलेल्या 'कॅसिनो रॉयल' (Casino Royale) चित्रपटातून जेम्स बाँडच्या भूमिकेत पदार्पण केले होते. २०२१ मधील 'नो टाइम टू डाय' (No Time To Die) या चित्रपटात बाँडने सर्वोच्च बलिदान दिल्याचे दाखवण्यात आले आणि त्यासोबतच क्रेगने या भूमिकेचा निरोप घेतला.
आतापर्यंतच्या जेम्स बाँड अभिनेत्यांचा प्रवास
अधिकृत 'इऑन प्रॉडक्शन्स' चित्रपट मालिकेत आतापर्यंत सहा अभिनेत्यांनी जेम्स बाँडची भूमिका साकारली आहे:
शॉन कॉनरी: १९६२ ते १९७१ या काळात सर्वप्रथम त्यांनी या गुप्तहेराची भूमिका गाजवली.
जॉर्ज लेझनबी: १९६९ मध्ये त्यांनी एका चित्रपटात बाँडची भूमिका केली.
रॉजर मूर: १९७३ ते १९८५ या प्रदीर्घ काळात त्यांनी ही भूमिका साकारली.
टिमोथी डाल्टन: १९८७ ते १९८९ दरम्यान त्यांनी दोन चित्रपटांत काम केले.
पियर्स ब्रॉस्नन: १९९५ ते २००२ या काळात त्यांनी चार चित्रपटांत बाँडची भूमिका निभावली.
डॅनियल क्रेग: २००६ ते २०२१ दरम्यान पाच चित्रपटांतून त्यांनी ही भूमिका साकारली
रॉबर्ट पॅटिनसनच्या निवडीपूर्वी या भूमिकेसाठी अनेक कलाकारांची नावे आघाडीवर होती. सुरुवातीला 'युफोरिया' फेम जेकब एलोर्डीच्या नावाची चर्चा होती, मात्र त्याने या भूमिकेसाठी ऑडिशनही दिले नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर 'स्लो हॉर्सेस' मालिकेतील सहकलाकाराने दिलेल्या संकेतांनंतर जॅक लोडेन याचे नाव समोर आले होते. याशिवाय कॅलम टर्नर हा देखील या भूमिकेसाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, अखेर रॉबर्ट पॅटिनसनने या शर्यतीत बाजी मारत '007' चा वारसा पुढे नेण्याचा मान मिळवला आहे.