पुढारी ऑनलाईन डेस्क - सत्तरच्या दशकातील सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री रीता अंचन यांचे निधन झाले आहे. त्या ६८ वर्षांच्या होत्या. हिंदी, कन्नड आणि पंजाबी, गुजराती काही दक्षिणात्य चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी दिवंगत अभिनेते लोकेश यांच्यासोबत प्रमुख भूमिकांमध्ये अभिनय केला होता.
रीता अंचन १९७२ मध्ये एफटीआयआयमधून उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यावेळच्या चित्रपटातील त्यांची गाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यांनी 'पारसंगदा गेंडे थिम्मा' या दाक्षिणात्य चित्रपटात मारकानी ही भूमिका साकारली होती. रिपोर्ट्सनुसार, त्या मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अभिनेत्री कोरा बदन, लडकी जवान हो गई, आप से प्यार हुआ, सुंदरभा आणि फर्ज प्यार सह अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मारकानीच्या भूमिकेतील त्यांच्या अभिनयाने त्यांना सिनेमा प्रेमींमध्ये लोकप्रिय बनवलं. राधाकृष्ण मंचिगैया यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या बेंगलोरला राहत होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
दिग्दर्शक रघुराम डीपी यांनी पोस्ट करत लिहिले, 'तुमच्या सर्वांसोबत त्यांची जीवन कहाणी शेअर करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पारसंगदा गेंडे थिम्मामध्ये आपल्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री रीता अंचन यांनी जगाचा निरोप घेतला. परमेश्वर त्यांच्या परिवारास दु:ख सहन करण्याची ताकद देवो.'