रिषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला कांतारा : चॅप्टर 1चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. भय आणि उत्सुकता यांचे मिश्रण असलेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता रिषभ शेट्टीला अनंत अडचणींचा सामना करावा लागला.याबाबत नुकतेच रिषभने शेयर केले आहे. (Latest Entertainment News)
रिषभ म्हणतो, ‘आमच्यावर कामाचे प्रेशर इतके होते की गेले काही महीने मी नीट झोपूही शकलो नाही. सेटवरच्या प्रत्येकाने या सिनेमासाठी अपार मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज आम्ही सिनेमा रिलीजची घोषणा करू शकलो आहे. सेटवर अनेक भयंकर अपघात झाले. यांची माहिती वेळोवेळी माध्यमांनी दिली आहेच. पण या सगळ्यांमध्ये मीही 4-5 वेळा मरता मरता वाचलो आहे. पण देवाच्या कृपेने आज मी सुखरूप आहे.’
या सेटवर मृत्यू होणे, अपघात होणे, क्रू मेंबरच्या जीवावर बेतणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. या सेटवर कलाभवन नीजू या कलाकराचे निधन झाले. कांताराच्या टीममधील महत्त्वाचा हिस्सा म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते.
यानंतर कांताराच्या पहिल्या सिनेमात दिसलेले अभिनेता राकेश पुजारी यांचे वयाच्या 33 व्या वर्षी ह्रदय क्रिया थांबून मृत्यू झाला आहे.
आणखी एका घटनेत एक ज्युनियर कलाकार एमएफ कपिल उडुपी यांचा जिल्ह्यातील सौपर्णीका नदीत बुडून मृत्यू झाला.
तर चौथी घटना म्हणजे शूटिंग सुरू असताना एका तलावाच्या उथळ भागात बोट पलटली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि ३० क्रू मेंबर्स या अपघातातून सुखरूप बचावले.
गांधी जयंती आणि दसऱ्याच्या सुट्ट्यांचे औचित्य साधत हा सिनेमा 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.