Rinku Rajguru dance on sairat jhal ji video viral
मुंबई - 'सैराट'ची आर्ची पुन्हा एकदा चर्चेत आलीय. रिंकू राजगुरूचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून 'सैराट' चित्रपटातील सैराट झालं जी या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. रिंकूने याच चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केला होता. या भूमिकेतूनच ती घराघरात पोहोचली. 'आर्ची' या तिच्या व्यक्तिरेखेमुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे आर्चीची क्रेझ अद्यापही टिकून आहे. आता तिच्या एका डान्स व्हिडिओमुळे रिंकू पुन्हा चर्चेत आलीय.
सोशल मीडियावर सध्या रिंकू राजगुरूचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू डान्सची प्रॅक्टिस करताना दिसते. तिने डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. कॅप्शन लिहिलीय- 'पहिलं ते पहिलंच असतं'. सोबतच तिने #firstisalwaysspecial असा हॅशटॅगही दिलेला आहे.
रिंकूचा हा डान्स पाहून अनेकांना तिच्या 'सैराट'मधील आर्चीची आठवण आली आहे. चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्सचा पाऊस पाडलाय. चाहते म्हणाले, ''आकाश ठोसर बरोबर हा डान्स बघायला खूप छान वाटलं असतं आठवण २०१६ ची, पहिले ते पहिले असते का माहित ते काय असते जे असत ते नेमक काय असत, सैराटचा पार्ट २ देखील बनवा, तू खूप सुंदर आहे रिंकू, एकदम झकास रिंकू..''
सैराट हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट होय. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आटपट प्रॉडक्शन बॅनरखाली दिग्दर्शित आणि सह-निर्मित केला होता. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री (२०१३) बनवल्यानंतर सैराटची पटकथा लिहिली. संवाद त्यांचे भाऊ भरत यांनी लिहिले होते. हा चित्रपट महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या मंजुळेंच्या गावात चित्रित करण्यात आला होता.