भोजपुरी सिनेमातील अत्यंत लोकप्रिय कलाकार म्हणून अभिनेते रवीकिशन यांना ओळखले जाते. काही काळ हिंदी सिनेमात नशीब आजमावल्यानंतर रवी यांनी भोजपुरीकडे आपला मोर्चा वळवला. त्यात ते यशस्वीही झाले. पण सुरुवातीचे दिवस मात्र त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. एका मुलाखती दरम्यान त्यांनी या आठवणी शेयर केल्या आहेत. कामाचे पैसे मागितल्यावर निर्मात्याने रवीकिशन यांचा अपमान केला होता. याबाबत बोलताना ते म्हणतात, हा किस्सा 1992 चा आहे. मी नुकतेच भोजपुरी सिनेमे करायला सुरुवात केली होती. घरच्यांना वाटत होते सिनेमालाईनमध्ये गेल्यावर माझ्याकडे खूप पैसे येत असतील.
यामुळे एकदा वडिलांनी विचारले तुझ्याजवळ काही पैसे आहेत का? गावातली गहाण पडलेली जमीन सोडवायची आहे. वडिलांनी काही मागितल्यावर मी नकार देऊ शकलो नाही. एका सिनेमाचे मला 7000 मिळणार होते. काही पैसे पूर्वी दिले होते. उर्वरित पैसे डबिंगवेळी मागायचे असे मी ठरवले. डबिंग झाल्यावर मी निर्मात्याकडे पैसे मागितले. त्याने विचारले कसले पैसे? मी म्हणालो माझ्या कामाचे. यावर निर्माता म्हणाला, एकतर तुला तुझ्या कामाचे पैसे मिळतील किंवा सिनेमात तुझा रोल कट न करता राहील. दोन्ही पैकी काय पाहिजे? त्याचे उत्तर ऐकून मी स्तब्ध झालो, एकीकडे माझा सिनेमातील रोल होता दुसरीकडे वडिलांनी मागितलेले पैसे.
मी तिथून निमूटपणे निघालो. रस्त्याने जाताना पूर्णवेळ रडत होतो. माझ्या आयुष्यातील हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.’
रवीकिशन यांनी बॉलीवुड सिनेमात झळकण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण यश मिळत नव्हते. अशावेळी त्यांना एका भोजपुरी सिनेमाची ऑफर आली. निराश मनाने आईसोबत बोलताना ते म्हणतात, मी आईला हा सिनेमा करण्याबाबत विचारले त्यावेळी तिने गावाकडील लोकांसाठी करण्यासाठी सल्ला दिला. तो सल्ला ऐकून सैय्या हमार या सिनेमासाठी होकार कळवला. तो पहिला सुपरहिट सिनेमा ठरला.
अभिनेची आवड असलेल्या रवीकिशन यांनी लहानपणी एका नाटकात सीतेचा रोल केला होता. त्यांना साडीत पाहून कर्मठ वडिलांनी त्यांना अत्यंत मारले असल्याची आठवणही यावेळी रवीकिशन यांनी सांगितली. याच वडिलांनी ज्यावेळी ते यशस्वी झाले त्यावेळी वडिलांनी क्षमा मागितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.