छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित छावा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिर्डीला साईमंदिरात पोहोचले. साईंच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघांनी साई समाधीचे दर्शन घेतलं. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित छावा सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. छावा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला रिलीज होतोय.
विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छावाच्या संपूर्ण टीमने कंबर कसल्याचं दिसून येत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकी कौशल आणि रश्मिका मंदाना देव दर्शन करताना दिसताहेत.
रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असतानाही ती आणि विकी कौशल शिर्डी साई मंदिरात पोहचले. यावेळी पूर्ण रस्त्यात विकीने रश्मिकाचा हात पकडत तिला सहारा दिल्याचे दिसून आले. अलिकडेच विकी कौशल घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात पोहोचले होते. आज या जोडीने शिर्डीत येऊन साई दर्शन घेतले.
यावेळी बोलताना विकी कौशल याने प्रथमच शिर्डीला आल्याचे सांगत जीवनात काहीही सुरवात करताना देवाचे आशीर्वाद महत्वाचे असल्याच सांगितले. तर रश्मिकाने देखील खूप छान वाटल्याचे मराठीत सांगितले.