Ranveer Singh's Don 3 controversy
अभिनेता रणवीर सिंहने 'डॉन ३' या सिनेमातून अचानक माघार घेतल्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. या एका निर्णयामुळे सिनेमाच्या निर्मात्यांचे (एक्सेल एंटरटेनमेंट) तब्बल ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FWICE) या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी निर्मात्यांच्या संघटनांना पत्र लिहून कळवले आहे की, कलाकारांच्या अशा वागण्यामुळे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान होत आहे.
त्यांनी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया यांसारख्या प्रमुख निर्माता संस्थांना पत्र लिहून, अभिनेत्यांसाठी वचनबद्ध असलेल्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याच्या वाढत्या प्रवृत्तीविरुद्ध सामूहिक कारवाईची मागणी केली आहे. अभिनेता रणवीर सिंहने फरहान अख्तरच्या 'डॉन ३' मधून कथितरीत्या शेवटच्या क्षणी माघार घेतल्याबद्दल फेडरेशनने त्याच्याविरुद्ध 'असहकार्य' (non-cooperation) निर्देश जारी केले होते. त्यानंतर संघटनेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
FWICE ने 'इंडस्ट्रीतील वाढत्या पॅटर्न'कडे वेधले लक्ष
FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी स्वाक्षरी केलेल्या सविस्तर पत्रात, फेडरेशनने 'डॉन ३' च्या परिस्थितीचे वर्णन उद्योगातील एका मोठ्या आणि चिंतेच्या ट्रेंडचा भाग म्हणून केले आहे. कारण, अभिनेत्याने अचानक माघार घेतल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान निमार्र्त्यांना झेलावे लागणार आहे. मीडिया रिपोटर्नुसार, पत्रात म्हटले आहे की, अभिनेते कोणत्याही पूर्व सल्लामसलतीशिवाय, योग्य सूचनेशिवाय किंवा संबंधित भागधारकांशी व्यावसायिक चर्चा न करता वचनबद्ध असलेल्या प्रोजेक्टमधून शेवटच्या क्षणी माघार घेत आहेत. ज्यामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबद्दल आम्ही आमची गंभीर चिंता नोंदवू इच्छितो."
कामगारांवर येते उपासमारीची वेळ
संस्थेचे म्हणणे आहे की, जेव्हा एखादा मोठा अभिनेता सिनेमाच्या कामाला सुरुवात झाल्यावर अचानक माघार घेतो, तेव्हा फक्त पैशांचेच नुकसान होत नाही. त्या सिनेमाशी संबंधित शेकडो कामगार, तंत्रज्ञ आणि छोट्या कलाकारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
नव्या कडक नियमांची मागणी
भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी आता कडक नियम किंवा SOP (मानक कार्यप्रणाली) बनवण्याची मागणी FWICE ने केली आहे. यात प्रामुख्याने खालील गोष्टींवर भर दिला जाईल :
एकदा सिनेमा करण्याचे ठरवल्यावर तो मध्येच सोडण्यासाठी स्पष्ट नियम असावेत.
वाद झाल्यास तो सोडवण्यासाठी एक ठराविक कायदेशीर मार्ग असावा.
अचानक सिनेमा सोडल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित केली जावी.
सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) तयार करण्यासाठी फेडरेशनने निर्माता संस्थांसोबत संयुक्त बैठकीचे आवाहन केले आहे. शेवटी, FWICE ने असे आवाहन केले आहे की, फिल्म इंडस्ट्री हे एका कुटुंबासारखे आहे. जर आपण सर्वांनी मिळून शिस्त पाळली, तरच या उद्योगाची आर्थिक प्रगती होईल आणि भविष्य सुरक्षित राहील.
'डॉन ३' वाद
'डॉन ३' मधून रणवीर बाहेर पडल्यानंतर FWICE ने पुष्टी केली आहे की, नुकसानीचा दावा जवळपास ४५ कोटी रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम एक्सेल एंटरटेनमेंटने (Excel Entertainment) रणवीर सिंहकडे नुकसान भरपाई म्हणून मागितल्याचे वृत्त आहे.