मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि 'डॉन ३' या चित्रपटाचा वाद आता एका गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. रणवीर सिंहने दिग्दर्शक फरहान अख्तरच्या 'डॉन ३' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून अचानक माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) त्याच्या विरोधात 'असहकार' (Non-cooperation) निर्देश जारी केले आहेत. या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
FWICE च्या मते, रणवीर सिंगने या चित्रपटासाठी करार केला होता, परंतु शूटिंग सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी फेडरेशनने रणवीरला तीनदा बोलावले होते, मात्र त्याने उपस्थित राहणे टाळले. या वादावर मुंबईत पत्रकार परिषद घेत फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी माहिती देताना सांगितले की, ११ एप्रिल रोजी फरहान अख्तर यांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती. यानंतर 'एक्सेल एंटरटेनमेंट'चे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी फेडरेशनच्या कार्यालयात आपली बाजू मांडली. या बैठकीत प्री-प्रोडक्शनवर झालेला ४५ कोटी रुपयांचा खर्च आणि त्याचे पुरावे सादर करण्यात आले. यामध्ये हॉटेल बुकिंग, लोकेशन आणि २०० पेक्षा जास्त कामगारांच्या प्रवासाचा खर्च समाविष्ट असून, हे सर्व दस्तऐवज ऑडिटेड आहेत. रणवीरने स्क्रिप्टपासून ते लोकेशन पाहणीपर्यंत सर्व प्रक्रियेत सहभाग घेतला होता, तसेच चित्रपटाच्या घोषणेसाठी त्याच्यासोबत प्रोमोही शूट करण्यात आला होता, असेही स्पष्ट करण्यात आले.
दुसरीकडे, रणवीर सिंहच्या वतीने २३ मे रोजी पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये, या प्रकरणावर फेडरेशनला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याला चोख प्रत्युत्तर देताना फेडरेशनचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी स्पष्ट केले की, कायदा हा कोणत्याही सुपरस्टारपेक्षा मोठा नाही. जोपर्यंत रणवीर वैयक्तिकरित्या येऊन चर्चा करत नाही, तोपर्यंत फेडरेशनचे ५००० सभासद आणि ३२ संलग्न संघटनांचे तंत्रज्ञ, स्पॉटबॉय यांसह कोणताही कर्मचारी त्याच्यासोबत काम करणार नाही, असा ठराव घेण्यात आला आहे.
अशोक पंडित यांनी पुढे सांगितले की, आमिर खान आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासारख्या दिग्गजांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. हा वाद केवळ एका अभिनेत्याचा नसून पाच लाख कामगारांच्या रोजगाराचा आहे. अचानक चित्रपट थांबल्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे हे पाऊल उचलणे गरजेचे होते. भविष्यातील जाहिरातींच्या शूटिंगमध्येही रणवीरला याचा फटका बसू शकतो, कारण तंत्रज्ञ आणि वॅनिटी व्हॅन पुरवठादार फेडरेशनच्याच अखत्यारीत येतात.
'डॉन ३' चा हा वाद डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झाला, जेव्हा रणवीरने अचानक चित्रपट सोडला. त्याने स्क्रिप्टमधील बदलांचे कारण दिले होते, तर दुसरीकडे निर्मात्यांनी त्याच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 'डॉन ३' च्या वादावर भाष्य करताना फरहान अख्तर यांनी संयमी प्रतिक्रिया दिली असून, जे घडले ते स्वीकारून पुढे जाण्याचे संकेत दिले आहेत.
FWICE ही फिल्म इंडस्ट्रीतील कामगारांची एक प्रमुख संघटना असून, ३२ संघटनांचे ती प्रतिनिधित्व करते. व्यावसायिक वाद, करारांचे उल्लंघन आणि मजुरी न मिळणे यांसारख्या प्रश्नांवर फेडरेशन हस्तक्षेप करते. एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास 'असहकार' पुकारण्याचा अधिकार या संघटनेकडे आहे. सध्या रणवीर सिंहने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, या असहकार ठरावामुळे त्याच्या आगामी प्रकल्पांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.