मुंबई - काल २८ सप्टेंबर रोजी अभिनेता रणबीर कपूरने ४३ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सेलिब्रिटींसह, परिवार आणि फॅन्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पत्नी, अभिनेत्री आलिया भट्टने देखील सोशल मीडियावर रणबीरसोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज रणबीरसाठी खास ठरले आहेत.
या खास दिवशी रणबीरचा वाढदिवस अधिक खास ठरला. कारण पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहासोबत त्याने समुद्रकिनारी हा दिवस साजरा केला. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीर आणि आलिया दोघेही व्हेकेशनवर गेल्याचे दिसते. समुद्रकिनारी शांत वातावरणात त्यांनी खासगी पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन केल्याचे फोटोतून कळते. यावेळी राहाने रणबीरला आपल्या चिमुकल्या हातांनी ‘बर्थडे विश’चे लेटर लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये रणबीर-आलिया सोबत सूर्यास्त पाहताना दोघे पाठमोरे दिसताहेत. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांची मुलगी राहा रणबीर सोबत केक कापताना दिसतात. आणखी एका खूप सुंदर फोटोत राहाने आपल्या वडिलांसाठी एक प्रेमळ नोट लिहिली. या नोटमध्ये लिहिलं- 'या जगातील सर्वात बेस्ट पापा.. हॅप्पी बर्थ डे.'
आलियाने या पोस्टसोबत एक भावूक संदेश देखील लिहिला, 'happy birthday our whole and soul'. सोबतच तिने रेड हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. या पोस्टवर फॅन्स आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.