Poonam Pandey dropped from Ramleela
मुंबई - वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्लीतील आयोजित रामलीला कार्यक्रमात तिच्या सहभागाला नागरिक आणि धार्मिक संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला होता. अखेर वाढत्या विरोधानंतर आयोजकांनी पूनम पांडे हिला या कार्यक्रमातून हटवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये पूनमला मंदोदरीच्या भूमिकेसाठी निवडण्यात आल्याचे वृत्त समोर येताच विरोध होऊ लागला. विश्व हिंदू परिषद आणि अन्य संता यांनी विरोध दर्शवला होता.
दरम्यान, पूनमने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं की, ती ही भूमिका साकारण्यासाठी सात्विक झाली आहे. ती नवरात्रीचे ९ दिवस व्रत देखील करेल.
रामलीला हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा सोहळा असून, दरवर्षी लाखो भक्त त्यात सहभागी होतात. मात्र यावर्षी पूनम पांडेला मंदोदरीच्या भूमिकेसाठी सिलेक्ट करण्यात आलं होतं. ही बाब उघड होताच स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर उमटला. शिवाय, अनेकांनी तिच्या भूतकाळातील वादग्रस्त विधानं आणि कृतींवर टीका केली. काही धार्मिक संघटनांनी तर विरोध दर्शवून आयोजकांना विनंती केली की, श्रद्धा, धार्मिक भावनांचा मान राखावा.
पूनम पांडे ही सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी तिने टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यास कपडे उतरवण्याची घोषणा केली होती. त्या विधानामुळे ती देशभरात टीकेची धनी झाली होती. त्यानंतर अनेक वेळा तिने दिलेल्या वक्तव्यांमुळे आणि फोटोंमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, पूनम पांडेकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
२०१३ मध्ये ती चित्रपट नशामध्ये पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली होती, ज्यामध्ये तिने खूप बोल्ड सीन्स दिले होते. यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आले होते.