Ramanand Sagar Grandson shiv sagar on ramayana film cast  
मनोरंजन

Ramanand Sagar Grandson: ‘रणबीरला रामाच्या भूमिकेत स्वीकारू शकत नाही’; रामानंद सागर यांच्या नातवाचे ‘रामायण’ कास्टवर प्रश्नचिन्ह

Ramanand Sagar Grandson Shiv Sagar on Ranbir Kapoor -‘रणबीरला रामाच्या भूमिकेत स्वीकारणं कठीण’; रामानंद सागर यांच्या नातवाने ‘रामायण’ कास्टिंगवर उपस्थित केले सवाल

पुढारी वृत्तसेवा

रणबीर कपूर आगामी ‘रामायण’ चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारत आहे. या कास्टिंगवर रामानंद सागर यांच्या नातू शिव सागर यांनी प्रतिक्रिया देत रणबीरला रामाच्या भूमिकेत स्वीकारणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली रामाची प्रतिमा आणि नव्या चित्रपटातील कास्टिंग यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. चित्रपटातील कलाकारांची निवड, त्यांचे लूक, कॉस्ट्यूम आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता टीव्हीवरील गाजलेल्या 'रामायण' मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचे नातू आणि निर्माते-दिग्दर्शक शिव सागर यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगवर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. विशेषतः रणबीर कपूरच्या रामाच्या भूमिकेबाबत त्यांनी व्यक्त केलेलं मत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

एका मुलाखतीत शिव सागर यांनी 'रामायण'मधील जवळपास संपूर्ण कास्टिंग आवडल्याचं सांगितलं. मात्र, रणबीर कपूरची रामाच्या भूमिकेसाठी झालेली निवड त्यांना वैयक्तिकरित्या पटलेली नाही. रणबीरचा 'अॅनिमल'मधील लूक आणि भूमिका त्यांच्या मनातून अद्याप गेलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शिव सागर म्हणाले की, ''एक कास्टिंग सोडली तर मला बाकीची संपूर्ण कास्टिंग आवडली आहे. मात्र, माझ्यासाठी रणबीर कपूरला अॅनिमलनंतर रामाच्या भूमिकेत स्वीकारणं कठीण आहे. जेव्हा मी रामजींकडे पाहतो, तेव्हा मला वाटतं की या भूमिकेसाठी एखादा नवा चेहरा निवडायला हवा होता.''

त्यांच्या मते, 'रामायण'सारख्या संवेदनशील विषयासाठी कलाकाराची आधीची प्रतिमा हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. एखाद्या अभिनेत्याची पूर्वीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसलेली असेल, तर त्याच्याकडे नव्या आणि श्रद्धेच्या भूमिकेत पाहताना अडचण निर्माण होऊ शकते.

‘रणबीरच्या आधीच्या भूमिकांचं ओझं आहे

शिव सागर यांनी पुढे रणबीर कपूर आणि चित्रपटातील इतर कलाकारांची तुलना करत आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते, यश आणि साई पल्लवी यांच्या आधीच्या भूमिकांची छाप रणबीरच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यांना अनुक्रमे रावण आणि सीतेच्या भूमिकेत तुलनेने सहज स्वीकारू शकतात.

तुम्ही अतिशय मजबूत सपोर्टिंग कास्ट घेऊ शकता. यश खूप चांगला दिसत आहे आणि साई पल्लवीही उत्तम वाटत आहे. त्या दोघांवर त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांचं तितकं ओझं नाही. मात्र, रणबीरसोबत त्याच्या आधीच्या भूमिकांचं मोठं ओझं आहे. म्हणूनच आम्ही आमच्या मालिकांमध्ये शक्यतो नवे चेहरे घेतो. त्या कलाकाराची याआधीची प्रतिमा किंवा इतिहास प्रेक्षकांच्या मनात नसतो,'' असं शिव सागर यांनी म्हटलं.

त्यांनी यामागे आणखी एक व्यावसायिक बाजू असल्याचंही मान्य केलं. रणबीर कपूरसारखा मोठा अभिनेता चित्रपटात असल्यामुळे ‘रामायण’च्या मार्केटिंगला मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, केवळ मार्केटिंगचा विचार न करता अशा धार्मिक आणि भावनिक विषयासाठी योग्य चेहरा निवडणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

''कदाचित रणबीरला घेतलं नसतं, तर चित्रपटाचं मार्केटिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं नसतं. या बाजूचाही विचार करायला हवा. पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर अशा भूमिकांसाठी नवीन चेहरा अधिक योग्य ठरतो. कारण ‘रामायण’ पाहिल्यानंतर लोक रणबीरला पुन्हा 'अॅनिमल'सारख्या भूमिकेत स्वीकारतील का? विशेषतः रामजी आणि रामायणाचा विषय असेल तर लोक अधिक संवेदनशील आणि भावनिक होतात,'' असं त्यांनी सांगितलं.

'रामायण केवळ मायथॉलॉजी नाही, तो आपला इतिहास'

रामानंद सागर यांच्या कुटुंबाचा ‘रामायण’शी असलेला जवळचा संबंध लक्षात घेता शिव सागर यांचं मत विशेष महत्त्वाचं मानलं जात आहे. त्यांच्या आजोबांनी १९८७ मध्ये छोट्या पडद्यावर आणलेल्या 'रामायण' मालिकेने भारतीय प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं होतं. शिव सागर यांनी रामायणाकडे पाहण्याच्या भारतीय दृष्टिकोनाबद्दलही भाष्य केलं. त्यांच्या मते, पाश्चात्त्य देशांमध्ये अशा कथांना 'मायथॉलॉजी' म्हटलं जातं. भारतातही अनेकदा 'मायथॉलॉजी' हा शब्द वापरला जातो. मात्र, भारतीयांसाठी रामायण केवळ एक पौराणिक कथा नाही.

''पाश्चात्त्य देशांमध्ये याला मायथॉलॉजी म्हटलं जातं. भारतातही तसंच म्हटलं जातं. पण आपल्यासाठी हा इतिहास आहे. लोक आजही दररोज रामाची पूजा करतात. राम आपल्या इतिहासाचा एक भाग आहेत,'' असं शिव सागर यांनी स्पष्ट केलं.

कॉस्ट्यूम आणि काही कास्टिंग निर्णयांवरही नाराजी

'रामायण'च्या कास्टिंगसोबतच चित्रपटातील काही कलाकारांचे पोशाख आणि लूक याबाबतही शिव सागर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील प्रत्येक निर्णय आपल्याला आवडलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

''शेवटी जनता हीच राजा असते. जनता जे स्वीकारेल, तेच अंतिम ठरतं. मला काही कलाकारांची कास्टिंग आणि काही कॉस्ट्यूम आवडले नाहीत. त्यामध्ये आणखी सुधारणा करता आली असती,'' असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया नेमकी कशी असेल, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेषतः रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरला प्रेक्षक कितपत स्वीकारतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'रामायण'वर सातत्याने होत आहेत आक्षेप

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’वर केवळ कास्टिंगमुळेच नव्हे, तर विविध कारणांमुळे सातत्याने चर्चा आणि टीका होत आहे. रणबीर कपूरची रामाच्या भूमिकेसाठी निवड झाल्यापासूनच काही प्रेक्षकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेवरूनही सोशल मीडियावर चर्चा झाली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या शूर्पणखेच्या लूकवरही सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी तिच्या लूकवरून मीम्स शेअर केले. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर काही कलाकारांच्या वेशभूषेबाबतही प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले. कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या लारा दत्ताच्या कॉस्ट्यूमवरही सोशल मीडियावर टीका झाली. काही प्रेक्षकांनी तिचा लूक रामायणातील पात्रापेक्षा आधुनिक टीव्ही मालिकेतील सुनेसारखा वाटत असल्याचं म्हटलं.

VFX आणि बजेटवरूनही प्रश्न

‘रामायण’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्हीएफएक्स वरूनही सोशल मीडियावर चर्चा झाली. काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या ग्राफिक्सवर नाराजी व्यक्त केली. यावर रणबीर कपूरनेही प्रतिक्रिया देत मोबाईल फोनवर किंवा खराब इंटरनेट कनेक्शनवर ट्रेलर पाहून VFX चा अंदाज लावणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. चित्रपट मोठ्या पडद्यावर, विशेषतः IMAX 3D मध्ये पाहिल्यानंतर त्याचा खरा अनुभव घेता येईल, असं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटगृहात ‘रामायण’ कसं दिसतं, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT