मनोरंजन

Rajinikanth Jailer 2 : सुपरस्टार रजनीकांत यांचा जलवा, ‘जेलर २’ ने ९ व्या दिवशी ‘बॉर्डर २’ सह ‘हनुमान अंश’लाही टाकले मागे!

दोन्ही चित्रपटांच्या देशांतर्गत एकूण कमाईचा आकडा मागे टाकला. या विकेंडला देशांतर्गत कमाईचा आकडा ३८० कोटीवर जाण्याचा अंदाज

Namdev Gharal

Jailer 2 Box Office Collection 15 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर २ ची हवा अजूनही जोरात आहे. या चित्रपटाने यशाचे अनेक टप्पे ओलांडले आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ६२८.०५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता प्रदर्शित झाल्यापासून ९ व्या दिवशी कमाईच्या बाबतीत दोन रेकॉर्ड केले आहेत. सनी देवोल याचा बॉर्डर २ व नुकताच प्रदर्शित झालेला बाबा निम करोली यांच्या जीवनावरील ‘हनुमान अंश’ या दोन्ही चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

१५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या शुक्रवारी कमाईमध्ये थोडी घट नोंदवली गेली असली, तरी या चित्रपटाने ‘बॉर्डर २’ आणि ‘हनुमान अंश’ या दोन्ही मोठ्या चित्रपटांच्या भारतातील एकूण लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकून एक मोठा टप्पा गाठला आहे. सणासुदीच्या सुट्ट्यांनंतर थिएटरमधील गर्दी काहीशी कमी होती मात्र, आता दुसऱ्या वीकेंडला सुरुवात झाल्याने चित्रपटाच्या कमाईत पुन्हा मोठी वाढ होण्याची आणि चित्रपट देशांतर्गत कमाईचा नवा विक्रम रचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

९ दिवसांत देशभरात ३४८ कोटींचा टप्पा पार

‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, ‘जेलर २’ ने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी भारतात निव्वळ १४.५० कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचे भारतातील एकूण निव्वळ कलेक्शन ३४८.८५ कोटी रुपयांवर पोहोचले असून चित्रपट ३५० कोटींच्या अगदी उंबरठ्यावर आहे. तर जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ६२८.०५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५,८८७ शोमधून ५९.७० कोटी रुपयांची दमदार ओपनिंग घेतली होती. प्रदर्शनाच्या पाच दिवस आधी, म्हणजेच १० ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगने १४ ऑक्टोबरपर्यंत जगभरात ८० कोटींचा आकडा पार केला होता.

या ताज्या आकडेवारीसह ‘जेलर २’ ने दोन बड्या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत: देशांतर्गत कमाईत बॉर्डर २: एकूण ३२९ कोटी रुपये तर हनुमान अंशने एकूण ३३९ कोटी रुपये कमावले होते आता जेलरने या दोघांनाही मागे टाकले आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाने या दोन्ही चित्रपटांच्या एकूण लाइफटाइम कलेक्शनला अवघ्या नऊ दिवसांत मागे टाकले आहे.

पहिल्या आठवड्यातच ३०० कोटींचा आकडा पार

चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच देशांतर्गत ३०० कोटींचा टप्पा ओलांडून ३३४.३५ कोटींची कमाई केली होती. नवव्या दिवशी झालेल्या १४.५० कोटींच्या कमाईमुळे एकूण आकडा ३४८.८५ कोटींवर गेला.

दुसऱ्या वीकेंडला ३८० कोटींची अपेक्षा

शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांची गर्दी वाढण्याची दाट शक्यता असून दुसऱ्या वीकेंडअखेर चित्रपटाची देशांतर्गत कमाई ३८० कोटींच्या आसपास पोहोचू शकते, असा अंदाज ट्रेड ॲनालिस्टकडून व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT