मनोरंजन

‘जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है’ 

Pudhari News

मुंबई : पु‍ढारी ऑनलाईन 

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या अंत:करणावर अधिराज्य गाजवणारे आणि 'काका' या लाडक्या नावाने ओळखले जाणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज १८ जुलैला स्मृतिदिन. सत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ७० च्या दशकातील एक सदाबहार मेलडी यूग संपुष्टात आले. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ एकापेक्षा एक १५ सुपरहिट चित्रपट दिले. 

चित्रपटात एन्ट्री 

राजेश खन्ना यांनी चेतन आनंद यांच्या १९६५ मध्ये आलेल्या 'आखरी खत' या चित्रपटापासून सिने इंडस्ट्रीत एन्ट्री केली. त्यानंतर 'आनंद', 'आराधना', 'आन मिलो सजना,' 'मर्यादा,' 'दो रास्ते', 'अंदाज', 'बावर्ची', 'मेरे जीवन साथी', 'कटी पतंग', 'हम दोनो', 'अवतार', 'अमर प्रेम', 'स्वर्ग' यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. 'दो दिलों के खेल मे' हा २०१० ला रिलीज झालेला चित्रपट अखेरचा ‍ठरला. तब्बल १०१ चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो हिरो म्हणून काम केले. 

१४ फिल्मफेअर नामांकन, ४ वेळा पुरस्कार 

राजेश खन्ना यांचे फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन जाहीर झाले होते. आनंद (१९७२), बावर्ची (१९७३), नमक हराम (१९७४) आणि अमृत (१९८७) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके ॲवॉर्ड, आयफा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, अप्सरा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. 

राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान आहे. किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून राजेश यांना आवाज दिला. तर आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले. 'मेरे सपनों की राणी कब आएगी तू' म्हणत शर्मिला टागोर यांच्या रेल्वेमागे गाडीने पिच्छा करणारा, 'जिंदगी कैसी हे पहेली…कभी ये हसाए कभी ये रूलाए' म्हणत आयुष्याची गणिते मांडणारा तर कधी 'एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई' म्हणत तिच्या सौंदर्याचे गुणगाण करणारा, 'गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है'…म्हणत प्रेमाचे गीत गाणारा तर कधी 'ये जो मोहब्बत है' म्हणत नशेत बुडून आता प्रेम कधीच करणार नाही म्हणणाऱ्या रोमँटिक हिरो राजेश खन्नांची आठवणीतील गाणी अनेकांच्या तोंडावर रूळलेली दिसतात. 

चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण 

त्यांनी ३ चित्रपटांची निर्मिती केली होती. यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. 

डिंपल कपाडियाशी लग्न  

राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले होते. १९८४ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. त्यामुळे ते एकाकी पडले होते. 

असे मिळाले 'काका' नाव 

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान राजेश यांनी त्यांना काका नाव कसे मिळाले, याविषयी सांगितले होते. काका या शब्दाचा अर्थ पंजाबीमध्ये लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा सिनेजगतात पाऊल ठेवले, त्यावेळी मी तरूण होतो. त्यामुळे सर्वजण काका म्हणू लागले. अनेकवेळा पंजाबीमध्ये काके अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारली जायची. हळूहळू काका हेच नाव पुढे लोकप्रिय झाले. 

 'आनंद' कधीच मरत नाही!

हृषिकेश मुखर्जी यांची निर्मिती असलेला क्लासिक चित्रपट 'आनंद' १९७१ मध्ये रिलीज झाला होता. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. या चित्रपटातील संवादही हिट ठरले. राजेश यांच्या रेकॉर्ड केलेला आवाज टेपच्या माध्यमातून ऐकवला जातो-"बाबू मोशाय…जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जहाँपनाह…जिसे ना आप बदल सकते है ना मै…..हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है, जिसकी डोर उपरवाले की उंगलीयोंमे बंधी है…कौन, कब, कैसे उठेगा कोई नही जानता."

राजेश खन्ना यांचे हे संवाद अमर बनले. 

राजेश खन्ना यांचे अन्य सदाबहार संवाद पाहा – 

* पुष्‍पा, मुझसे ये आंसू नहीं देखे जाते. आय हेट टीयर्स

– अमर प्रेम १९७२ 

* जिसमें इंसान की भलाई हो, वो काम कभी बुरा नहीं होता

– बावर्ची १९७२ 

* बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए…लंबी नहीं

– आनंद १९७१  

* ये तो मैं ही जानता हूं कि जिंदगी के आखिरी मोड पर कितना अंधेरा है.

– सफर १९७० 

* मैं मरने से पहले मरना नहीं चाहता

– सफर, १९७०  

* एक छोटा सा जख्‍म बहुत गहरा दाग बन सकता है और एक छोटी सी मुलाकात जीवनभर का साथ बन सकती है

– आराधना, १९६९  

अनेक चित्रपटातील त्‍यांचा रोमँटिक अंदाज, त्‍यांच्‍या अभिनयातील वेगळा अंदाज आजही लक्षात राहणारा आहे. राजेश खन्‍ना यांच्‍या चित्रपटातील काही सुंदर गाणी एकदा पाहाच… 

(video – Rajshri youtube वरून साभार) 

 

https://www.youtube.com/watch?v=LgKueB7fCzshttps://www.youtube.com/watch?v=yTktbXFZP6ohttps://www.youtube.com/watch?v=ql1-jjEPErwhttps://www.youtube.com/watch?v=YIWX9vCffmshttps://www.youtube.com/watch?v=vo1MykK4u8U

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT