Raid 2 opening day collection
पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगणचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'Raid 2' गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली आहे.
अजय देवगणचा 'रेड' हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता त्याचा सिक्वेल 'रेड २' गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारचा केसरी २ हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात आहे. तसेच सनी देओलचा जाट देखील चित्रपटगृहात असून गुरुवारी 'हिट द थर्ड केस' आणि 'रेट्रो' हे दोन चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत.
याशिवाय संजय दत्तचा 'द भूतनी' आणि हॉलिवूडचा 'थंडरबोल्ट्स' देखील प्रदर्शित झाला आहे. हे बडे सिनेमे चित्रपटगृहात असूनही अजय देवगणने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर सहा चित्रपटांना मागे टाकून उत्तम ओपनिंग केली आहे.
अजय देवगणचे गेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तेवढी कमाई करु शकले नाहीत. सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या 'आझाद'ने चाहत्यांची निराशा केली. त्याआधीही त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. पण आता अजय देवगणने 'रेड २' द्वारे जोरदार कमबॅक केले आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, 'रेड २' ने गुरुवारी पहिल्या दिवशी १६.६९ कोटी रुपये कमावले आहेत. 'रेड २' चे बजेट सुमारे ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. यानुसार, चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा व्यवसाय हा उत्तम आहे. बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईच्या गणितानुसार, जर एखाद्या चित्रपटाने पहिल्या दिवशी त्याच्या बजेटच्या दहा टक्के कमाई केली तर तो चित्रपट अॅव्हरेज मानला जातो. २० टक्के ही चांगली सुरुवात मानली जाते. सध्या 'रेड २' ची बॉक्स ऑफिसवरील कमाई चांगली होताना दिसत आहे.
'रेड २' या वर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. या वर्षातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट 'छावा' आहे. दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा 'सिकंदर' आहे. तरीही सिकंदर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. यानंतर 'रेड २' तिसऱ्या स्थानावर आला आहे. 'स्काय फोर्स' चौथ्या स्थानावर आहे आणि 'जाट' पाचव्या स्थानावर आहे.
'रेड 2' चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, अमित सियाल, यशपाल शर्मा, सुप्रिया पाठक, श्रुती पांडे आणि ब्रिजेंद्र काला यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे.