Ajay Devgn-Vaani Kapoor movie Raid-2 box office collection
मुंबई : अजय देवगनचा रेड २ चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. ओपनिंग शानदार ठरल्यानंतर आता हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट व्हायला तयार आहे. चित्रपटात वाणी कपूर, अजय देवगन यांच्या मुख्य भूमिका आहेत. वाणी कपूर अजय देवगणसोबतच्या तिच्या नवीन चित्रपट 'रेड २' ला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे अत्यंत आनंदित आहे. केवळ चार दिवसांतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि तिकीट खिडकीवर भरघोस कमाई करत आहे.
ओपनिंग वीकेंडमध्ये ‘रेड २’ ने आतापर्यंत ७०.७५ कोटी रुपये कमावले आहेत आणि लवकरच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे.
यावर वाणी म्हणाली, ''बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच एक स्वप्नासारखं वाटतं. एखाद्या अशा चित्रपटाचा भाग होणं, जो प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडला जातो, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. 'रेड २' ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायक आहे.'' वाणी कपूरच्या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही कौतुक केले आहे.
वाणी पुढे म्हणाली, ''चित्रपटाची कथा खूपच ताकदीची आहे. राज कुमार गुप्ता सरांच्या दूरदृष्टीने दिग्दर्शित या प्रोजेक्टवर काम करणं माझ्यासाठी एक समृद्ध अनुभव होता. माझ्या भूमिकेसाठी मिळणाऱ्या कौतुकाबद्दल मी माध्यमांचे, समीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानते. अजय सर आणि राज कुमार गुप्ता सर यांच्यासोबत काम करताना मला एक कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळालं. 'रेड २' चे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टमुळे मला अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळते आणि सतत प्रगती करत राहायचं बळ मिळतं.''
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित चित्रपटात अजय देवगन सोबत रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक, रजत कपूर, अमित सियाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.