पुढारी ऑनलाईन डेस्क : संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीसाठी 'पुष्पा 2 : द रुल' (Pushpa 2 : The Rule) फेम अल्लू अर्जुन (Allu Arjun) आज मंगळवारी (दि.२४) हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिस स्थानकात हजर झाला. अल्लू अर्जुनला पोलिसांनी संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. पोलिसांनी त्याला आज सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार तो दिलेल्या वेळेत चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात हजर झाला.
तो त्याचे वडील आणि निर्माते अल्लू अरविंद, सासरे आणि काँग्रेस नेते चंद्रशेखर रेड्डी आणि त्यांच्या वकिलांसह पोलिस स्थानकात दाखल झाला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस स्थानकाजवळ आणि चित्रपटगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
रविवारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी अर्जुनच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गेल्या रविवारी उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांच्या एका गटाने अल्लू अर्जुनच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली होती. अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ज्युबली हिल्स येथील घरात घुसून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली होती. त्यांना सोमवरी हैदराबादच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये (Sandhya theatre) अल्लू अर्जुन स्टारर (Allu Arjun) 'पुष्पा २' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी म्हणजेच ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी झाली होती. यात एका ३५ वर्षीय एम रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा श्री तेज (Sritej) नावाचा ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. एक रात्र कारागृहात काढल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. आज त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.