Punha Shivajiraje Bhosale Movie Review  Pudhari photo
मनोरंजन

Movie Review Punha Shivajiraje Bhosale | बळीराजाच्या व्यथेला घातलेली साद - पुन्हा शिवाजीराजे भोसले

Punha Shivajiraje Bhosale - बळीराजाच्या व्यथेला घातलेली साद - पुन्हा शिवाजीराजे भोसले

स्वालिया न. शिकलगार

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा शेतकऱ्यांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा चित्रपट आहे. संवेदनशील दिग्दर्शन, प्रभावी संवाद आणि ग्रामीण वास्तव दाखवणारी कहाणी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसतो. बळीराजाच्या व्यथेला साद घालणारा आणि आत्मसन्मानाचा जयघोष करणारा चित्रपट!

अनुपमा गुंडे

महेश मांजरेकर यांनी याआधीही मी शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईतून हद्दपार होणाऱ्या मराठी माणसांची व्यथा मांडली होती. आता पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये त्यांनी राज्यातल्या बळीराजाच्या व्यथेला हात घातला आहे. एकनाथ इंगवले (पृथ्वीक प्रताप) हा दारिद्र्याने पिचलेला निसर्ग आणि व्यवस्थेने मारलेला शेतकरी रोजच्या जगण्याचा संघर्ष करत वडील निवृत्ती (शंशाक शेंडे), मुलगी रखमा (त्रिशा ठोसर), मुलगा कृष्णा (भार्गव जगताप) आणि पत्नी यांच्यासोबत गुण्यागोविंदाने रहात असतो.

अशातच एके दिवशी शेत नांगरत असतांना एकनाथच्या पोटात वेदना होतात. तो या दुखण्याकडे दुर्लक्ष करणार असतो, पण मुलीच्या हट्टाखातर तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सांगतात. शेतावर काढलेले कर्ज, हप्त्यांचा डोंगर आणि आता या आजारपण या खर्चाच्या कात्रीत जगता येणं शक्य नसल्याची जाणीव झाल्याने एकनाथ मृत्यूला कवटाळतो. त्याच्या आत्महत्येने व्यथीत झालेली त्याची पत्नीही विहिरीत उडी घेते. आई-वडिलांचे छत्रं हरवलेली मासूम रखमा या दुःखात घरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे पाहून त्यांना साद घातले आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज अवतरतात. त्यांना गावातील एकेका शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वास्तव कळतं जाते, तसे ते आधिकच व्यथीत होतात.

इथल्या जनतेने, व्यवस्थेने आपले विचार केवळ घोषणा आणि भा। षणांपुरतेच मर्यादित ठेवले आहेत. त्यामुळे या पोि शद्याचे आणि मराठी माणसांचे अस्तित्व पणाला लागले आहे याची साक्ष महाराजांना एकनाथचे वडील निवृत्ती आणि शेतकऱ्याच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अॅड. दिनकर जगताप यांच्याद्वारे पटत जाते. या पोशिंद्याच्या पाठीशी भक्कम उभं राहण्यासाठी महाराज पुन्हा व्यवस्थेने उद्दाम केलेले तथाकथित राजकारणी, गुंड आणि पोलीस यांच्या विरोधात दंड थोपटतात. बळीराजाला देशोधडीला लावणारी ही व्यवस्था किती किडलेली, पोखरलेली आहे याचा धांडोळा या चित्रपटातून घेतला आहे आणि तो संवादात जास्त पेरला गेला आहे. बळीराजाला हतबल करणाऱ्या व्यथांच्या प्रसंगांची आधिक जोड दिली गेली असती तर चित्रपट आधिक भिडला असता.

या लढाईत मांजरेकर यांनी घेतलेली दिग्दर्शकीय स्वातंत्र्यातील थोडासा अतिरेकीपणा सोडला तर बळीराजाचे आजचे डोळ्यात पाणी उभे करणारे वास्तव जीवंत करण्यात यशस्वी ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून (सिध्दार्थ बोडके) यांनी त्यांचे रांगडेपण, रयतेपोटीचा कळवळा, तळमळ मांडली आहे. सयाजी शिंदे यांचा उद्दाम आणि भ्रष्ट पोलीस इन्सपेक्टर चव्हाण, सिध्दार्थ जाधव यांचा उस्मान खिलारी, तर विक्रम गायकवाड यांचा भ्रष्ट आमदार या अभिनेत्यांनी भूमिकांना न्याय दिला आहे.

आजच्या शेतकऱ्यांची व्यथा राजकारण्यांना माहिती नाही असे नाही, पण त्या व्यथेच्या बळावर राजकारण करून आपल्या तुंबड्या भरतात आणि बळीराजाचे प्रश्न वर्षानुवर्षे तेच आणि तसेच रहातात, हे वास्तव महाराष्ट्र गेली ६५ वर्षे पहातो आहे. पण परिस्थिती जैसे थे आहे. निसर्गाच्या या अवस्थेला इथली व्यवस्था जबाबदार आणि न्यायव्यवस्था हतबल आहे. त्यामुळे या दोन्ही व्यवस्थांना जागं करण्यासाठी, रयतेचे स्वराज्य आणण्यासाठी छत्रपती शिवराय अवतरायला हवेत, हे खरंच आहे.

पुन्हा शिवाजी राजे भोसले
सादरकर्ते : झी स्टुडिओ निर्माते : दि ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्यसाई फिल्मस अँड क्रिझोल्ह फिल्म्स कथा, पटकथा, दिग्दर्शन : महेश मांजरेकर निर्माते : राहुल पुराणिक, राहुल सुंगध प्रेझेंटेड बाय : उमेशकुमार बन्सल, बावेश जानवलकर डीओपी : अभिमन्यू डांगे संवाद : सिध्दार्थ साळवी, संजय पवार गायक : मानसी घोष, शंकर महादेवन, गौरव चाटी गीतकार : वैभव देशमुख, संजय कृष्णाजी पाटील, आदि शंकराचार्य संगीत : हितेश मोडक, संकलन राहुल भाटणकर स्टार : ***

मुख्य भूमिका

सिध्दार्थ बोडके, सयाजी शिंदे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, सिध्दार्थ जाधव, विक्रम गायकवाड, मंगेश देसाई, शंशांक शेंडे, संदीप जुवाटकर, विजय निकम, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, नित्यश्री धनलक्ष्मी, सांची भोयर, पायल जाधव, नयन जाधव, आकाश घरत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT