Cannes Film Festival Diksha Ujagare Pudhari
मनोरंजन

Cannes Film Festival: पुणेकर दीक्षाची ‘कान्स’भरारी! ‘जीव’ चित्रपटाची प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

Diksha Ujagare Cannes: पुण्यातील अभिनेत्री दीक्षा उजागरे हिच्या ‘जीव – द क्रिएचर’ या मराठी चित्रपटाची प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Cannes Film Festival Diksha Ujagare: 'पिफ'मध्ये पुरस्कार पटकावल्यानंतर थेट फ्रान्समधील प्रतिष्ठित 'कान्स' फिल्म फेस्टिवलसाठी अभिनेत्री दीक्षा उजागरे हीच्या 'जीव - द क्रिएचर' या चित्रपटाची निवड झाली आहे. फिल्म मार्केट विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी नुकतीच याची घोषणा केली. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या चित्रपटाचं अभिनंदन केलं आहे.

रवींद्र जाधव लिखित-दिग्दर्शित 'जीव – द क्रिएचर' हा चित्रपट महाराष्ट्रातून लुप्त होत असलेल्या आदिवासी कोकणी समाजाची भाषा, लोकगीतं, परंपारिक वाद्ये, चालीरीतींचा वेध घेतो. १२ ते २३ मे दरम्यान फ्रान्समध्ये कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपटाच्या निवड प्रक्रियेत छाया कदम, अमोल परचुरे, तृप्ती भोईर, भाऊसाहेब कऱ्हाडे आणि विजय खोचीकर या तज्ज्ञांच्या पॅनेलचा सहभाग होता.

फर्ग्युसन कॉलेज अन् ललित कला केंद्रातून धडे

दीक्षा उजागरे ही उदयोन्मुख कलाकार असून मुख्य अभिनेत्री म्हणून 'जीव' हा तिचा पहिलाच पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी तिनं अनेक लघुपट आणि टीव्ही मालिकांमधूनही कामे केली आहेत. दीक्षाचं महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झालं. याच ठिकाणी तिच्यावर नाट्यस्पर्धांमधून अभिनयाचे संस्कार झाले.

त्यानंतर तिनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून अभिनयात एमए केलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आणि अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अल्पवधीतच दीक्षानं घेतलेल्या या 'कान्स'भरारीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दीक्षा व्यक्तिरिक्त 'जीव' चित्रपटात बेबीताई सूर्यवंशी, किरण काकडे, बालकलाकार आदर्श जाधव, रवींद्र जाधव, शिवाजी शेवाळे, उषा निंबाळकर आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT