Aastad Kale and Abhijeet Khandkekar on Priya Marathe
मुंबई - अभिनेता अभिजीत खांडकेकरची त्याची मैत्रिण अभिनेत्री प्रिया मराठेसाठी भावूक पोस्ट लिहिली. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनानंतर संपूर्ण कलाविश्व शोकाकुल आहे. अभिनेत्रीच्या निधनाने धक्का बसलेला अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. “नावाप्रमाणेच सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया आता आपल्यात नाही, हे अजूनही पटत नाही” अशा शब्दांत त्याने दु:ख व्यक्त केले.
अभिजीतची ही पोस्ट प्रियाच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे. त्याचबरोबर अभिनेता आस्ताद काळेने देखील पोस्ट लिहून तिच्या आठवणींना उजाळा दिलाय.
अभिजीत म्हणतो, ''भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एक्झिट असे शब्द प्रियाच्या संदर्भात वापरावे लागतील, ही गोष्टच मनाला पटत नाही. आयुष्य अतिशय भरभरून जगणारी प्रिया गेल्या दोन वर्षांत किती यातना सोसत होती, याची कल्पनाही करवत नाही.''
त्याने प्रियाच्या पती शंतनूचीही दखल घेतली. ''शंतनू, तू ज्या धीराने तिच्या सोबत होतास, त्याला तोड नाही'' असे तो म्हणाला. प्रियाच्या प्रकृतीबाबत मित्रपरिवार नेहमीच दिलासा देत होता की ती लवकर बरी होईल आणि बरी झाल्यावर पार्टी करू. पण ते दिलासे निरर्थक ठरले, असे अभिजीतने दु:ख व्यक्त केलेय.
प्रियाच्या अनुपस्थितीशी जुळवून घेणं कठीण आहे, तिची सवय करून घ्यावी लागणार आहे, असेही तो म्हणतो. ''तू अजून हवी होतीस प्रिया'' या शब्दांत त्याने तिच्या जाण्याने उरलेल्या पोकळीचा उल्लेख केला.
अभिनेता आस्ताद काळेने प्रिया मराठेच्या आठवणीत रमला. तिच्या निधनानंतर तिच्यासाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे. आस्तादने इन्स्टावर पोस्ट लिहून म्हटलंय, प्रियाच्या लढाईत काही मदत करू शकलो नाही याची खंत त्याला आहे.
तो म्हणतो की, प्रिया कायम शूर होती आणि कायम राहील. तिच्यासोबत जास्त वेळ घालवता आला नाही याचे दुःख आहे, पण ती सदैव आठवणीत राहील. प्रिया लोकप्रिय असूनही कधीही स्वभाव बदलली नाही. वैतागली पण कधी कुणावर ओरडून बोलली नाही. चिडलेली दिसली नाही. एक वर्षात जे काही तिने सहन केलं, यासाठी इतकी ताकद कुठून आणली? असाही प्रश्न त्याला पडलाय. तिच्या आठवणींना कायम जिवंत ठेवतील, असे आस्ताद म्हणतो.
पोस्टच्या शेवटी तो म्हणतो, ''तू अजून हवी होतीस प्रिया, पण तू आम्हाला जीवनाचा अर्थ शिकवून गेलीस. तुझ्या आठवणींना सलाम.''
अभिनेत्री प्रिया मराठेचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी कॅन्सरने निधन झाले. बऱ्याच काळापासून ती प्रसिद्धीपासून दूर होती. पवित्र रिश्ता मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सोशल मीडिया पासूनही ती दूर गेली होती. तिने तिची शेवटची पोस्ट २०२४ मध्ये शेअर केली होती. त्यात तिने पती शंतनू मोघेसोबतचे सुंदर क्षण दाखवले होते.